esakal | Cruise Party : आर्यन खानचा मुक्काम तुरुंगातच; कोर्टानं जामिनावरील निर्णय ठेवला राखून
sakal

बोलून बातमी शोधा

आर्यन खानचा मुक्काम तुरुंगातच; कोर्टानं निर्णय ठेवला राखून

आर्यन खानचा मुक्काम तुरुंगातच; कोर्टानं निर्णय ठेवला राखून

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या जामीन अर्जावर विशेष एनडीपीएस कोर्टात आज सुनावणी झाली. यावेळी एनसीबीसह सर्वांच्या वकिलांनी कोर्टात आपली बाजू मांडली. पण न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी निर्णय न देता यावर विचार करण्यासाठी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार असल्याचं सांगत निकाल २० ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला. त्यामुळं आर्यन खानसह तिघांना पुढील सहा दिवस ऑर्थर रोड तुरुंगातच रहावं लागणार आहे.

आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती पण कोर्टाकडे वेळ कमी असल्यानं सुनावणी पूर्ण झाली असली तरी त्यावर निर्णय होऊ शकला नाही. यानंतर कोर्टाला पुढील पाच दिवस सलग सुट्ट्या आल्यानं कोर्टाचं कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळं आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. निकाल तयार करण्यासाठी काही काळ वेळ हवा असल्यानं कोर्टानं २० ऑक्टोबरपर्यंत आपला निर्णय सुरक्षित ठेवला. या निकालानंतरही या तिघांना जामीन मिळतो की फेटाळला जातो हे पहावं लागेल.

हेही वाचा: मुनमुन धामेचाचं नाव विनाकारण गोवण्यात आलं; वकिलांचा कोर्टात दावा

दरम्यान, आर्यन खानचे वकील अॅड. अमित देसाई यांनी जोरदार युक्तीवाद केला. आर्यन हा पूर्णपणे निर्दोष असून त्याच्याकडे कुठलेही ड्रग्ज किंवा अंमली पदार्थ आढळून आलेले नाहीत. इतरांकडे जे अंमलीपदार्थ सापडले आहेत त्याच्याशी याचा काहीही संबंध नाही, असा त्यांनी दावा केला. पण एनसीबीच्या वकिलांनी हे सर्व दावे फेटाळून लावत आर्यन खान हा या संपूर्ण कटाचा भाग होता त्याला इतरांकडे असलेल्या अंमली पदार्थांची पूर्णपणे माहिती होती. त्याच्याकडे जरी अंमली पदार्थ सापडले नसले तरी इतरांकडे जे सापडले ते तो क्रूझ पार्टीत घेणार होता याचा एनसीबीला पूर्णपणे संशय असल्याचं म्हटलं. त्याचदृष्टीने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. हे प्रकरणं आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीशी जोडलेलं असू शकतं त्यामुळं यामध्ये परराष्ट्र मंत्रालयालाही समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे हे प्रकरणं मोठं असल्यानं कोणालाही जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तीवाद एनसीबीच्या वकिलांनी कोर्टात केला.

पुढील कार्यवाही काय असू शकेल?

जर २० ऑक्टोबरला कोर्टानं आर्यन खानला जामीन मंजूर केला तर तो तुरुंगात बाहेर येईल. पण जर त्याचा जामीन नाकारला गेला तर त्याला वरच्या कोर्टात अर्थात हायकोर्टात दाद मागता येईल. पण ही प्रक्रिया देखील वेळखाऊ ठरु शकते. कारण सुरुवातीला हायकोर्टात जामीनासाठी अर्ज सादर करावा लागेल त्यानंतर सुनावणीची तारीख निश्चित झाल्यानंतर दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद होईल. त्यानंतर कोर्ट दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्यावर निर्णय देईल.

loading image
go to top