अशोक गावडे राष्ट्रवादीचे नवे जिल्हाध्यक्ष

अशोक गावडे राष्ट्रवादीचे नवे जिल्हाध्यक्ष
अशोक गावडे राष्ट्रवादीचे नवे जिल्हाध्यक्ष

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक अशोक गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे; तर प्रदेश सचिव प्रशांत पाटील यांची नवी मुंबईच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावडे व पाटील यांच्या नियुक्‍त्या जाहीर केल्या. गावडेंची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून राष्ट्रवादीची जुनी कार्यकारिणी बरखास्त झाल्याने राष्ट्रवादीतून भाजपच्या वाटेवर असलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांना पक्षश्रेष्ठींनी दणका दिला.

गणेश नाईक यांचे धाकटे पुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ काही महिन्यांनी गणेश नाईकदेखील भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याची चर्चा आहे. संदीप नाईकांच्या भाजप प्रवेशानंतर गणेश नाईक यांनी अद्यापही आपल्या प्रवेशाबाबत मौन सोडलेले नाही. त्यांनी बाळगलेले मौन ते भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसह नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. 

नाईकांसोबत भाजपमध्ये राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवक भाजपमध्ये गेल्यास नवी मुंबईत राष्ट्रवादी औषधाला तरी उरेल का, असा टोला काही भाजपवासी नगरसेवकांकडून मारला जात होता; मात्र भाजपमध्ये न जाता राष्ट्रवादीतच राहण्याबाबत २५ नगरसेवकांनी ठाम भूमिका मांडली. या नगरसेवकांना एकत्र करण्यात नगरसेवक अशोक गावडे यांना यश आले. सुरुवातीला गावडेंसोबत राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक होते. आता यात वाढ होऊन २५ नगरसेवक झाल्याचा दावा गावडेंकडून करण्यात येत आहे. 

गावडेंसोबत असलेल्या नगरसेवकांना एकत्र करून शनिवारी (ता. ३) शरद पवार यांची एक छोटेखानी भेटही संपन्न झाली होती. या भेटीत पवार यांनी जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे गावडे यांची नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे आधीच्या कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांना पायउतारा व्हावे लागले आहे.

नवी मुंबईत राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काम करणार आहे. नवी मुंबई जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. त्यानंतर नवी मुंबईत राष्ट्रवादीचा मोठा मेळावा घेण्यात येईल.
- अशोक गावडे, नगरसेवक व जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com