सहायक आयुक्त 25 लाखांची लाच घेताना अटकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

विरारच्या एका विकसकाविरोधात एका व्यक्‍तीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर बांधकामाविरोधात कारवाई करू नये यासाठी 25 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. मागणी करताना कार्यालयात असणारी दोन माणसे शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्यासंबंधित आहेत.

नालासोपारा : वसई-विरार महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्‍त प्रेमसिंग जाधव यांना 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विरारच्या एका विकसकावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

विरारच्या एका विकसकाविरोधात एका व्यक्‍तीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर बांधकामाविरोधात कारवाई करू नये यासाठी 25 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. मागणी करताना कार्यालयात असणारी दोन माणसे शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्यासंबंधित आहेत. पैसे न दिल्यास जीवास धोका असल्याची भीती दाखवत त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताच जाधव यांना अटक करण्यात आली. 25 लाखांपैकी पाच लाख रुपयांची लाच जाधव यांनी कार्यालयात स्वीकारली होती, असा तक्रारीत आरोप केला आहे. 

विरार पूर्व मनवेलपाडा येथे साई रिदम बिल्डर्स ऍन्ड डेव्हलपर्स यांचे बांधकाम आहे. हे बांधकाम अनियमित असून, कारवाई न करण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी वसई-विरार महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांनी केली होती. या प्रकरणावरून विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एकूण तीन आरोपी आहेत. दोन जण फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे वसईचे अपर पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी सांगितले. 
जर याप्रकारे कुणी धमकावून लाच मागत असेल तर संबंधितांनी तक्रारीसाठी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Web Title: Assistant Commissioner Arrested with Bribe 25 Lakh