धक्कादायक ! कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

तापावरील उपचारादरम्यान मृत्यू झालेला सहायक पोलिस उपनिरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मुंबई : तापावरील उपचारादरम्यान मृत्यू झालेला सहायक पोलिस उपनिरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यातील या निरीक्षकाचा शुक्रवारी (ता. 8) घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने बळी घेतलेल्या मुंबईतील पोलिसांची संख्या चारवर गेली आहे. 

हे ही वाचा : तुमचं काम कौतुकास्पद, मात्र कायद्याचे भान ठेवा; उच्च न्यायालयाचे खडे बोल...

विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यातील या निरीक्षकाला मधुमेहाचा आजार होता. श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा व ताप असा त्रास होऊ लागल्यावर ते बुधवारी (ता. 6) खासगी डॉक्टरकडे गेले. परंतु, कोरोनाबाधेची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोठी बातमी : डिपार्टमेंटमध्ये फोफावतोय कोरोना; राज्यात एकूण 714 पोलिस कोरोना बाधीत

त्याच दिवशी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली; मात्र अहवाल येण्यापूर्वीच शुक्रवारी पहाटे 2 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री आलेल्या अहवालात ते कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी मुंबई पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, 309 जणांना लागण झाली आहे.

 Assistant police sub-inspector death by corona, read full stroy


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant police sub-inspector death by corona, read full stroy