उल्हासनगर : नगरसेवक सिरवानी यांच्यावर जिवघेणा हल्ला

दिनेश गोगी
गुरुवार, 16 मे 2019

  • उल्हासनगरात नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
  • सात जणांवर गुन्हा
  • 24 तासात आरोपींना अटक करण्याचे पोलिसांचे आश्वासन

उल्हासनगर : साई पक्षाचे नगरसेवक टोनी सिरवानी यांच्यावर काल मध्यरात्री जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे.याप्रकरणी सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी साई पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

स्थायी समितीची निवडणूक पुढच्या आठवड्यात आहे.साई पक्षाचे नगरसेवक टोनी सिरवानी हे सभापती पदासाठी इच्युक आहेत.त्यासाठी कालरात्री पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक आटोपून सिरवानी हे बंगलो एरियात राहणारे सभागृह नेते शेरी लुंड यांना त्यांच्या घरी सोडून परत येत असताना व्हीनस चौकात एक कार सिरवानी यांच्या कार समोर आडवी आली. सिरवानी यांनी विचारणा केली असता, त्यांना कार मधून बाहेर काढून आणि रिव्हॉलवर तलवारचा धाक दाखवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

टोनी सिरवानी यांनी कसाबसा स्वतःचा बचाव करून विट्ठलवाडी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली असता, गुंडानी त्यांचा पाठलाग केला.सिरवानी यांच्या तक्रारी वरुन सात अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जबर मुका मार लागल्याने सिरवानी यांना रात्री खाजगी रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले.दरम्यान आज दुपारी साईपक्षाचे अध्यक्ष तथा उपमहापौर जीवन इदनानी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी,कमल बठिजा,सुनिल गंगवानी आदिंनी पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांची भेट घेतली असता,24 तासात आरोपींना अटक करण्यात येणार असे आश्वासन शेवाळे यांनी दिले.

Web Title: Attack on corporator Tony Sirwani in Ulhasnagar