दहा रुपयांवरून एनएमएमटी वाहकावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

तिकिटाची रक्कम दिल्यावर बदल्यात उरलेल्या पैसे म्हणून १० रुपयांची नोट न दिल्यामुळे एनएमएमटीच्या कंडक्‍टरवर (वाहक) जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता.२१) रात्री १० वाजता पनवेल येथे घडली.

नवी मुंबई : तिकिटाची रक्कम दिल्यावर बदल्यात उरलेल्या पैसे म्हणून १० रुपयांची नोट न दिल्यामुळे एनएमएमटीच्या कंडक्‍टरवर (वाहक) जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता.२१) रात्री १० वाजता घडली. या प्रकरणात जखमी वाहक रामेश्‍वर इप्पर यांच्या तक्रारीनंतर पनवेल शहर पोलिसांनी आरोपी प्रवासी तन्मय कवठेकर याला अटक केली आहे. 

कोपरखैरणे ते पनवेल या मार्गावरील एनएमएमटीची बस क्रमांक एमएच-४३/एस ५३१८ ही बस रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी कोपरखैरणेमधून प्रवासी घेऊन पनवेलच्या दिशेने निघाली होती. रात्री १० वाजताच्या सुमारास तन्मय कवठेकर हा ३४ वर्षांचा प्रवासी कामोठे बस थांब्यावरून बसमध्ये चढला. त्याने बसवाहक ईश्‍वर इप्पर यांच्याकडून पनवेल गार्डन हॉटेल येथील नऊ रुपयांच्या तिकिटासाठी २० रुपये दिले. त्या बदल्यात इप्पर यांनी कवठेकर याला उर्वरित रक्कम म्हणून १० रुपयांचे आणि एक रुपयांचे नाणे दिले. परंतु, आपल्याला दहा रुपयांचे नाणे नाही तर नोटच द्या असा आग्रह धरला. मात्र, माझ्याकडे नोट नसल्याने नाणे दिल्याचे उत्तर इप्पर यांनी कवठेकरला दिले. त्यावरून कवठेकर याने खिशातील चाकू काढून इप्पर यांच्या मानेवर आणि गळ्याभोवती वार केले. 

या दरम्यान बसमधील प्रवाशांनी हल्लेखोर कवठेकर याला पकडले. तसेच पुढील घटना टाळण्यासाठी पनवेल शहर पोलिस ठाण्यात बस घेतली. या वेळी हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या इप्पर यांनी तत्काळ पनवेल शहर पोलिस ठाण्यात कवठेकर विरोधात तक्रार केली. पोलिसांनी प्रवाशांच्या मदतीने कवठेकर याला अटक केली. याआधीदेखील एनएमएमटी बसचालक आणि वाहकांवर प्रवासी आणि इतर वाहन चालकांकडून मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बसचालक आणि वाहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on NMMT conductor for ten rupees