पोलिसांवर त्यांची 'दबंगगिरी'; हल्ला करून झाले फरार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 March 2020

माणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) सागर कावळे आणि पोलिस चालक उद्धव टेकाळे यांच्यावर बुधवारी (ता.18) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. तालुक्‍यातील इंदापूर येथील पाणसई व वाढवण गावाच्या हद्दीत हा प्रकार घडला. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

रायगड : माणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) सागर कावळे आणि पोलिस चालक उद्धव टेकाळे यांच्यावर बुधवारी (ता.18) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. तालुक्‍यातील इंदापूर येथील पाणसई व वाढवण गावाच्या हद्दीत हा प्रकार घडला. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

हेही वाचा- गोळीबारप्रकरणी ...या नेत्याच्या भावाला अटक; जिल्ह्यात खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एपीआय सागर कावळे व चालक उद्धव टेकाळे हे दोघे बुधवारी रात्री माणगाव विभागीय गस्तीवर होते. पहाटे इंदापूर येथे आले असता त्यांच्या गाडीचा दुसऱ्या वाहनाशी किरकोळ अपघात झाला. या कारणावरून काही अज्ञातांनी त्यांना मारहाण केली. या वेळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत एपीआय कावळे यांच्या डोक्‍याला व पायाला मोठी जखम झाली असून, पायाचे हाड मोडले आहे; तर चालक टेकाळे यांच्या पायावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने, काही टाके पडले आहेत. हल्ल्यानंतर एपीआय सागर कावळे यांनी वायरलेस यंत्रणेवरून या प्राणघातक हल्ल्याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर दहा ते 15 मिनिटात घटनास्थळी पोलिसांची अधिक कुमक दाखल झाली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. या झटापटीत पोलिसांना हल्लेखोरांकडील एक मोबाईल सापडला आहे. त्यामुळे फरार आरोपी लवकरच सापडतील, असे पोलिस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशीद यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा- बनावट सॅनिटायझरमुळे राज्यभरात एफडीएचे छापासत्र

जिल्ह्यात नाकाबंदी 
पोलिसांनी संपूर्ण माणगाव तालुक्‍यासह रायगड जिल्ह्यात नाकाबंदी केली असून, या हल्लेखोरांना लवकरच अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले. या हल्लाप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on police in mangaon raigad