बनावट सॅनिटायझरवर एफडीएचे राज्यभरात छापासत्र!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 March 2020

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असताना अन्न व औषध विभागाने (एफडीए) राज्यभरात २२ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल १.५० कोटी रुपयांचे बनावट सॅनिटायझर जप्त केले आहेत.

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असताना अन्न व औषध विभागाने (एफडीए) राज्यभरात २२ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल १.५० कोटी रुपयांचे बनावट सॅनिटायझर जप्त केले आहेत. तसेच नागरिकांकडून मास्क व सॅनिटायझरची मागणी वाढत असून जादा दरात त्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे वितरक व उत्पादकांनी चांगल्या दर्जाचे आणि निश्‍चित केलेल्या किमतीत सॅनिटायझरची विक्री करावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केल्या आहेत.

हेही वाचा- कोरोनाची एसटी प्रवाशांना धास्ती

मुंबईमध्ये प्रत्येक आठवड्याला सरासरी सॅनिटायझरच्या दोन लाख छोट्या बॉटलचा पुरवठा होत असतो; मात्र गेल्या १५ दिवसांपासून मागणी वाढल्यामुळे मुंबईत अनेक दुकानांमध्ये सॅनिटायझर उपलब्ध नाहीत. सध्या एक आठवड्याला तब्बल १५ लाख बॉटल्सची मागणी होत आहे; मात्र नामांकित कंपन्यांकडून हा पुरवठा वेळेत करणे शक्‍य नसल्यामुळे बाजारात बनावट सॅनिटायझरची विक्री वाढली आहे. त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने एफडीएने राज्यभरात २२ ठिकाणी छापे मारले. या कारवाईत तब्बल १.५० कोटी रुपयांचे बनावट सॅनिटायझर जप्त केले आहेत. त्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता ‘आवश्‍यक वस्तू अधिनियम (ईसीए)’ अंतर्गत मास्क आणि सॅनिटायझर ३० जून २०२० पर्यंत बाजारात निश्‍चित दरामध्ये उपलब्ध करावेत, असे आदेश डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.

हेही वाचा- गड किल्ल्यामध्ये पर्र्यटकांना प्रवेश बंदी

किमती अव्वाच्या सव्वा
काही विक्रेत्यांकडून ३०० रुपयांचे मास्क १००० ते १२०० रुपयांना विकले जात आहेत; तर ४० रुपयांचे सॅनिटायझर्स १०० ते २०० रुपयांना विकले जात आहेत. त्यामुळे राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून नागरिकांना योग्य दरात सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी वाढत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FDA seizes across the state due to fake sanitizer