वन्य प्राण्याच्या हल्ल्यात बकरीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

मुरूड तालुक्‍यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील दांडा गावात वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात बकरीचा मृत्यू झाला.

अलिबाग : मुरूड तालुक्‍यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील दांडा गावात वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात बकरीचा मृत्यू झाला. हा हल्ला बिबट्याने केला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु वनाधिकाऱ्यांनी यास दुजोरा देण्यास टाळले.

दांडा गावातील शंकर पाटील यांच्या मालकीच्या बकऱ्या घरालगतच्या शेडमध्ये शुक्रवारी (ता. १५) बांधलेल्या होत्‍या. रात्री ९ च्या दरम्यान घरामागील फणसाड डोंगराकडून वन्यप्राण्याने शेडमध्ये असलेल्या गाभण बकरीला गंभीर जखमी केले. यात बकरीचा मृत्यू झाला. इतर बकऱ्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने हा वन्यप्राणी पळून गेला. शंकर पाटील यांनी तातडीने वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पवार यांनी बकरीचे शवविच्छेदन केले. 

दरम्‍यान, दांडा परिसरात फणसाड अभयारण्यातून बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचे नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांचे म्‍हणणे आहे. चारच दिवसांपूर्वी नांदगाव समुद्रकिनारी बिबट्याचे ठसे आढळून आले होते. 

फणसाड जंगलातून येणाऱ्या बिबट्याचा वावर या परिसरात जाणवत असतो. परंतु इतके भीतीचे वातावरण कधीच जाणवले नाही. शुक्रवारच्या रात्री गोठ्यात बकऱ्या जोरजोरात ओरडायला लागल्या; त्यामुळे घरातील माणसे जागी झाली होती. मोबाईलच्या बॅटरीवर जाऊन पाहिल्यावर बकरी तडफडत असल्याचे दिसून आले.
- शंकर पाटील, दांडा-नांदगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack wild animal on Goat