
मिरा रोड येथील पोलीस चौकी जाळण्याचा प्रयत्न
भाईंदर : मिरा रोड येथील शांती पार्क भागात असलेली पोलीस चौकी जाळण्याचा प्रयत्न एका तीस वर्षीय व्यक्तीकडून करण्यात आला. मात्र आसपासच्या नागरिकांनी तातडीने ही आग विझवल्यामुळे चौकीचे फारसे नुकसान झाले नाही. सुदैवाने यावेळी पोलीस चौकीत कोणीही नव्हते. नागरिकांनीच या व्यक्तीला पकडून पोलीसांच्या हवाली केले. सोमवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीचे नाव सन्नी कदम असून तो भाईंदर पूर्व येथे रहाणारा आहे.
सोमवारी सायंकाळी चौकीतील सर्व पोलीस कर्मचारी ईद आणि अक्षय्य तृतीयेसाठी बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असल्यामुळे चौकीत कोणीही नव्हते. आरोपी चौकीजवळ आला आणि त्याने आवारात उभ्या असलेल्या दुचाकीतून पेट्रोल काढून बाटलीत भरले आणि ते पेट्रोल चौकीच्या दरवाज्यावर शिंपडून चौकीला आग लावून दिली. आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आग विझवली. या घटनेत चौकीचे लाकडी दरवाजे थोड्याफार प्रमाणात जळले मात्र इतर कोणतीही हानी झाली नाही.
नागरिकांनी आरोपीला पकडून ठेवले. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला या आधीही गांजाचे सेवन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती अशी माहिती मिरा रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक विजयसिंग बागल यांनी दिली. दरम्यान आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Web Title: Attempt Set Fire Police Station 30 Year Old Man Shanti Park Area Mira Road
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..