सह्याद्रीच्या पायथ्याशी बिबट्याच्या कातडीसह आरोपी अटकेत

मुरलीधर दळवी
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुरबाड (ठाणे): मुरबाड तालुक्यातील वाघवाडी (पळू) येथील एका आदिवासीला बिबट्याच्या कातडीसह अटक करण्यात आली आहे. महिनाभर पाळत ठेऊन टोकावडे उत्तर व टोकावडे दक्षिण वनपरीक्षेञाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे.

मुरबाड (ठाणे): मुरबाड तालुक्यातील वाघवाडी (पळू) येथील एका आदिवासीला बिबट्याच्या कातडीसह अटक करण्यात आली आहे. महिनाभर पाळत ठेऊन टोकावडे उत्तर व टोकावडे दक्षिण वनपरीक्षेञाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे.

मोतीराम गोवींद सोंगाळ (रा. वाघवाडी, पळू) असे आरोपीचे नाव आहे. मुरबाड न्यायालयाने त्याला सात दिवस 23 एप्रिल पर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्याच्याजवळ बिबट्याची कातडी असल्याची गुप्त माहिती टोकावडे वनपरीक्षेञाचे कर्मचा-यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनकर्मचाऱ्यानी गेल्या महिन्याभरापासून गुप्त चौकशी सुरु केली. मात्र, आरोपी चलाख असल्याने तो थांगपत्ता लागू देत नव्हता. वनकर्मचा-यांनी अनेक क्लृप्त्या केल्या. परंतु, आरोपी हातात येत नव्हता व पुराव्याशिवाय अटक करणे कठीण होते.

वनकर्मचा-यांनी शेवटी सोंगाळ याचेकडे बनावट ग्राहक पाठवून कातडीचा सौदा केला. प्रथम आरोपीने दोन लाख रुपये किंमत मागीतली. शेवटी हा व्यवहार 1 लाखात ठरला. सोंगाळ याला विद्यानगर (पळू) येथे कातडी घेऊन येण्यास बनावट गिऱ्हाईक बनलेले वनकर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार तो त्या ठिकाणी आला व वनकर्मचाऱ्यानी आणलेल्या गाडीत बसून तो बॅगमध्ये ठेवलेली कातडी त्यांना दाखवित असताना त्या कर्मचा-यांनी आपली खरी ओळख दाखवली व सोंगाळ याला बिबट्याच्या कातडीसह अटक केली.

यावेळी आरोपी पळून जाऊ नये म्हणून आजूबाजूला वनकर्मचारी गुप्तरीत्या तैनात ठेवले होते. ही कारवाई गेल्या महिन्याभरापासून उपवनसंरक्षक ठाणे जितेंद्र रामगावकर, सहाय्यक वनसंरक्षक आर. बी. कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सुरु होती. यामध्ये टोकावडे वनपरीक्षेञ अधिकारी (उ.) चे संजय चन्ने, टोकावडे वनपरीक्षेञ अधिकारी (द.) चे तुळशीराम हिरवे, वनपाल खोडका, वनरक्षक पांडुसे, एल. एस. पवार, जी. बी. रावते, नितिन कोळी यांनी भाग घेतला होता. आरोपीला मुरबाड न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Attempted accused along with leopard skin at the foot of Sahyadri