'बेशरम ठाकरे सरकारला हजार व्होल्टेजचा झटका देण्याची गरज'; वीजबिलप्रकरणी भाजप नेत्याचा घणाघात

तुषार सोनवणे
Tuesday, 17 November 2020

भाजपनेते अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करत वीजबिलांमध्ये सवलत न दिल्याबाबत सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई - दिवाळीचे दिवस संपताच भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारविरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या नेत्यांकडून सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपनेते अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करत वीजबिलांमध्ये सवलत न दिल्याबाबत सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा - बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

दोन दिवसांपूर्वीच महावितरणाने परिपत्रक काढून राज्यातील वीजग्राहकांना लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव बिलांबाबत कोणतीही सूट / सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरे सरकारकडून वाढीव वीजबिलांमध्ये सूट मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. परंतु महावितरणाच्या निर्णयामुळे या सर्व आशा धूसर झाल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

हेही वाचा - 'स्मारक की मातोश्री तीन??'; मनसे नेत्याचा शिवसेनेला खोचक सवाल

वीजबिलप्रकरणी ठाकरे सरकारवर टीका करताना, भातळकर म्हटले की,  महावितरणाच्या परिपत्रकानुसार वीजबिलात कोणतीही सुट मिळणार नाही. वीजबिल न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याचे देण्यात आलेले आदेश हा केवळ बेशरमपणा नसून खोटारडे पणाचा कळस आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर या सरकारला जाग आली. या बेशरम आणि खोटारड्या सरकारला हजार व्हॉल्टचे शॉक देण्याची गरज आहे. भाजपने आंदोलन केल्यानंतर वीजबिलात सवलत देण्याचं नाटक ठाकरे सरकारने केले, पण अखेर आज यांचा खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे. त्यांच्या या निर्णयाविरोधात भाजप आंदोलन करेल आणि ग्राहकांना वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडेल. अशी झणझणीत टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडून काय प्रतिक्रीया मिळते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

-----------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atul Bhatkhalkar strongly criticizes Thackeray government on electricity bill issue