अरे वाह! ऑस्ट्रेलियासारखं पिंक लेक आता मुंबईतही, कुठे ते जाणून घ्या.

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

गेले अडीच महिने लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद अवस्थेत असल्याने निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन सद्या मानवाला होत आहे. नवी मुंबईतही अशाचप्रकारे पामबीच रस्त्याच्या कडेला वसलेल्या एनआरआय कॉलनी मागील खारफुटीत चक्क गुलाबी रंगाचे तळे अवतरले आहे.

नवी मुंबई : गेले अडीच महिने लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद अवस्थेत असल्याने निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन सद्या मानवाला होत आहे. नवी मुंबईतही अशाचप्रकारे पामबीच रस्त्याच्या कडेला वसलेल्या एनआरआय कॉलनी मागील खारफुटीत चक्क गुलाबी रंगाचे तळे अवतरले आहे. ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या पिंक लेकप्रमाणे पाणथळाच्या या जागेतील तळ्यांमधील पाण्याने गेल्या आठवड्यापासून गुलाबी रंग परिधान केला आहे. तलावात खाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन गेल्यामुळे पाण्याखाली निर्माण झालेल्या गुलाबी रंगाच्या बूरशीने हे पाणी गुलाबी झाल्याचा अंदाज बीएनएचएसचे संचालक दिपक आपटे यांनी वर्तवला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण प्रांतात असणारे भव्य पिंक लेक एक पर्यटनाचे ठिकाण आहे. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या भागाला भेट देत असतात. नवी मुंबईत अशाच प्रकारचे तळे गेल्या काही दिवसांपासून आपोआपच निर्माण झाले आहे. एनआरआय कॉलनी मागील तलावी जवळच्या खारफुटीतील तळ्यातील पाण्याला गुलाबी रंग आला आहे. सद्या उन्हाळ्याच्या महिन्यात उष्ण वातावरणात खाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याखाली जीवाणू आणि लाल रंगांच्या बूरशीपासून एक प्रकारची वनस्पती तयार झाल्याचा अंदाज आपटे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे पाण्याचा रंग गुलाबी झाला असल्याचे त्यांचे मत आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे या पाण्याचे नमूने घेऊन संशोधन करण्याची इच्छा आपटे यांनी व्यक्त केली आहे. परंतू सद्या लॉकडाऊनमुळे त्याठिकाणी जाता येत नसल्याने कांदळवने कक्षाला नमूने घेण्याची विनंती केली जाणार असल्याचे आपटे यांनी सांगितले. तळ्यात निर्माण झालेल्या गुलाबी रंगाच्या पाण्यामुळे कोणालाही नुकसान होणार नाही.

नवी मुंबईकरानो, तुमच्यासाठी अभिमानाची बातमी ! सलग दुसऱ्यांदा मिळवला 'हा' दर्जा

तळ्यातील गुलाबी रंगांच्या बूरशीचा आणि प्रदूषणाचा काडीमात्र संबंध नसल्याचे आपटे यांनी स्पष्ट केले. याआधी सुद्धा 2016 ला याच भागात गुलाबी रंगाचे तळे स्थानिकांना दिसून आले होते. परंतू त्यावेळी त्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. ज्या भागात हे गुलाबी तळे दिसून आले त्याठिकाणी फ्लेमिंगो (रोहीत पक्षी) वास्तव्यास येत असतात. या तळ्यातील खारफुटींच्या मुळापाशी सापडणारी खेकडी, मासे व शेवाळ खातात. तसेच हे लाल बुरशी देखील ते खात असावेत म्हणून त्यांचा रंग गुलाबी असू शकतो असाही अंदाज आपटे यांनी व्यक्त केला आहे. मे महिन्यातील गरम हवामान हे या प्रकारच्या बुरशीला पोषक वातावरण असल्याने याच काळात हे तलाव गुलाबी होतात. परंतू नंतर पाऊस पडायला सुरूवात झाल्यावर आपोआपच तळ्यातील गुलाबी पाणी रंग बदलून पुन्हा पूर्वीप्रमाणे होईल असा अंदाज सुक्ष्मजीव अभ्यासकांतर्फे वर्तवण्यात येत आहे. मात्र सद्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे या नयनरम्य दृश्याचा लाभ घेता येणार नाही.

like Australia there is a pink lake in navi mumbai check what is its particularity  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: like Australia there is a pink lake in navi mumbai check what is its particularity