मदतनिसांविना शवविच्छेदन

सकाळ वृत्‍तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

आरोग्य विभागाच्या प्रस्तावाबाबत पालिका अनभिज्ञ

पनवेल : मागील काही महिन्यांपासून मदतनीसांशिवाय शवविच्छेदन करावे लागत असल्याने पालिकेने मदतनीस उपलब्ध करून द्यावेत आणि त्यांचा पगार पालिकेच्या तिजोरीतून द्यावा, या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीला पालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी नागनाथ यमपल्ले यांनी दिली; मात्र पालिका प्रशासनाकडे असा कोणताही प्रस्ताव आला आहे, याबाबत माहितीच नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून पुढे आले आहे. 

या सर्व प्रकारात मदतनीस म्हणून काम करणार असलेल्या कर्मचाऱ्यांना काम करण्याबाबतचे पत्र उपलब्ध करून देण्यात आलेले नसल्यामुळे अद्यापही कटरशिवाय डॉक्‍टरांना खासगी मदतनीस घेऊन शवविच्छेदन करावे लागत आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र या जागेतील काही काम पूर्णावस्थेत असल्यामुळे पालिका मुख्यालयाशेजारील जुन्या जागेतच अद्यापपर्यंत शवविच्छेदन करण्यात येत आहे.  

मदतनीसाला देण्यात येणारा पगार पालिकेने द्यावा, याकरिता पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. लवकरच याबाबतचे काम करण्यास परवानगी दिली जाणार आहे.
- डॉ. नागनाथ येमपल्ली, प्रभारी अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पनवेल
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Autopsy without helper