विद्यार्थ्यांना समजेल असे शिक्षण असावे!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

मासिक पाळीबाबत जागृती
मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेबाबत आजही खूप गैरसमजुती आहेत. त्या दूर करण्यासाठी पवई आयआयटीच्या अभ्युदय टीमच्या मुलांनी पुढाकार घेतलाय. उपासना सामाजिक संस्थेचे सदस्य दीप्ती आणि सौरभ कशाळकर यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अभ्युदय टीमने विविध सामाजिक समस्यांवर आधारित पथनाट्यही सादर केले.

मुंबई - मुंबई आयआयटीच्या वतीने सुरू असलेल्या अभ्युदय वार्षिक महोत्सवात पहिल्याच दिवशी करिअर, व्यवसाय, आरोग्य आदी विषयांवर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. शनिवारी (ता. १२) पहिल्या दिवशी चार हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. प्रामुख्याने शिक्षणावर चर्चा झाली. शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना समजणारी असावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

आयआयटीमध्ये सुरू असलेल्या महोत्सवाचे ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. सामाजिक कार्यालयात सहभाग नोंदवण्यासाठी व्यवसाय कसा सुरू करता येईल याबाबतचे अनुभव सांगण्यासाठी ‘हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी’ या प्रसिद्ध मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्यासह बिहारचे व्यावसायिक रत्यजित सिंग, लेखिका रश्‍मी बन्सल, तंट्रा टी-शर्टचे संस्थापक रंजीव रामचंद्र आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिकांना मिळवून देण्यात आलेल्या रोजगाराबाबत रत्यजित सिंग आणि रंजीव रामचंद्र यांनी आपले विचार मांडले. रश्‍मी बन्सल यांनी धारावीत स्थानिकांनी तयार केलेल्या व्यवसायनिर्मितीचे कौतुक केले. ‘हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी’ हा चित्रपट व्यवसायनिर्मितीपेक्षाही भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची ओळख जगाला पटवून देण्यासाठी होता, असे दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले. आपल्या सकारात्मक विचारातून जगात आपण बदल घडवू शकतो, असा सल्ला माजी पोलिस अधिकारी शिवानंदन यांच्यासह पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी दिला. ‘शेपिंग युअर फ्युचर’ या चर्चासत्रात शैक्षणिक क्षेत्रातील बदलांबाबत युनिसेफमधील शैक्षणिक सल्लागार डॉ. एस. एस. मंथा, टीच फॉर इंडियामधील अभिजात बेडेकर आदींनी आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांना समजण्यासारखे शिक्षण असावे. प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता वेगळी असते. त्यामुळे विद्यार्थ्यागणिक शिकवणी पद्धत वेगळी असावी. ही पद्धत प्रत्येकाला शिक्षणाच्या जवळ घेऊन जाईल, असे ते म्हणाले.

विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला
प्रेरणादायी व्याख्यानासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमेश मदन यांनी सकारात्मक ऊर्जेसाठी आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. समस्यांवर मात करण्यासाठी त्या समजून घेऊन निर्णय तत्काळ अमलात आणले तर त्याचे निराकरण पटकन होते, असे ते म्हणाले. शेवटच्या सत्रात ई कचऱ्याबाबत केंद्रीय इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती विभागाचे संचालक डॉ. एस. चॅटर्जी आणि सोफिज इंटरनॅशनलच्या व्यवस्थापकीय संचालिका दीपाली सिन्हा यांची मुलाखत पत्रकार निधी जम्वाल यांनी घेतली.

मासिक पाळीबाबत जागृती
मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेबाबत आजही खूप गैरसमजुती आहेत. त्या दूर करण्यासाठी पवई आयआयटीच्या अभ्युदय टीमच्या मुलांनी पुढाकार घेतलाय. उपासना सामाजिक संस्थेचे सदस्य दीप्ती आणि सौरभ कशाळकर यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अभ्युदय टीमने विविध सामाजिक समस्यांवर आधारित पथनाट्यही सादर केले.

Web Title: Awareness about menstrual cycle