चंद्रपुरात 'अवेरनेस ऑन व्हील'

मंगेश सौंदाळकर
सोमवार, 9 जुलै 2018

मुंबई - ग्रामीण भागात आर्थिक गुन्ह्यांचे वाढते लोण रोखण्याकरिता चंद्रपूर पोलिसांनी "अवेरनेस ऑन व्हील' ही संकल्पना सुरू केली आहे. जनजागृती उपक्रमात दुर्गम भागातील खेड्यांत जाऊन पोलिस जनजागृती करीत आहेत. जनजागृतीमुळे दोन जणांची फसवणूक होता होता वाचली असून, या मोहिमेला ग्रामीण नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक फसवणुकीप्रमाणे समाजमाध्यमांवरच्या अफवाबाबतही पोलिस नागरिकांना साक्षरतेचे धडे देत आहेत.

रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासोबतच वाढते आर्थिक गुन्हे रोखण्यावर महाराष्ट्र पोलिसांनी भर दिला आहे. शहरांमध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रकार होतात. मात्र, याचे लोण आता ग्रामीण भागात पोचू लागले आहे.

शेतकऱ्यांना विम्याच्या नावाखाली, लॉटरी लागल्याचे सांगून फसवणूक केली जाते. दुर्गम भागात फसवणुकीचे प्रकार रोखण्याकरिता चंद्रपूर पोलिसांनी पुढाकार घेतला. चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षिका नियती ठाकर यांनी "अवेरनेस ऑन व्हील' ही संकल्पना सुरू केली. दुर्गम भागात सायंकाळच्या वेळेस नागरिक एकत्र जमतात. आर्थिक फसवणूक कशी रोखावी, समाजमाध्यमांवरच्या अफवांना कसे बळी पडू नयेत, याचे धडे दिले जातात. या उपक्रमाकरिता सात जणांचे पथक तयार केले आहे.

साधारण दीड तास नागरिकांना सायबर गुन्ह्याबाबत माहिती दिली जाते. त्यानंतर नागरिक त्यांच्या शंका पोलिसांना विचारतात. या उपक्रमामुळे दोन जणांची फसवणूक होता होता वाचली. दोन जणांना फसवणुकीबाबतचे फोन आले होते. त्यांनी वेळीच त्या फसव्या फोनबाबत माहिती पोलिसांना दिल्याचे चंद्रपूर सायबरचे उपनिरीक्षक विकास मुंडे यांनी सांगितले. तसेच, धुळ्याच्या घटनेनंतर अफवा रोखण्याकरिता पोलिस दुर्गम भागात जातात. सायबरप्रमाणेच अफवाबाबत नागरिकांना त्यातील गांभीर्य समजावून सांगितले जाते, असे अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी सांगितले.

असे आहे वाहन
"अवेरनेस ऑन व्हील'चे डिझाइन स्वत: पोलिसांनी तयार केले आहे. त्या वाहनामध्ये एलईडी लावण्यात आली आहे. एलईडीवर जनजागृतीचे व्हिडिओ दाखवतात. वाहनाच्या पुढील बाजूस व्हॉट्‌सऍप हेल्पलाइनचा नंबर नमूद केला आहे. मागील बाजूस वाईट गोष्टी टाइप, लाइक आणि शेअर करू नका, असे संदेश लिहिले आहेत.

Web Title: awareness on wheel police