एक्‍सिस बँक फसवणूकप्रकरणी 7 आरोपी गजाआड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

व्यक्‍तिगत कर्जदारांपैकी 36 कर्जदार अद्यापही मिळून आलेले नाहीत. ते राहत्या घराचा पत्ता बदलून दुसरीकडे पळून गेल्याने ते आरोपींचे साथीदार असण्याची शक्‍यता आहे. 

ठाणे : बॅंक कर्मचाऱ्यांनी काही दलालांच्या साह्याने 55 ग्राहकांची बोगस कागदपत्रे तयार करून ठाण्यातील ऍक्‍सिस बॅंकेच्या शाखेला तीन कोटी 36 लाखांचा गंडा घातला. मागील चार महिन्यांत झालेल्या अपहाराचा नौपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याप्रकरणी सात जणांना अटक केली. तसेच आणखी तिघे जण फरारी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एक कोटी 10 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

बॅंकेचे सेल्स मॅनेजर रोहित भरत भावसार, सेल्स प्रतिनिधी चेतन सुरेश शेरे, सीपीए स्टाफ अधिकारी नितीन नारायण घाडीगावकर, बॅंक डाटा एन्ट्री गिरीश अशोक भोईर, दलाल प्रशांत प्रदीप कीर, सईद बशीर शेख, रवींद्र यशवंत ठाकूर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 85 लाख आणि व्यक्तिगत कर्जदारांनी जमा केलेली 25 लाखांची रक्कम अशी एक कोटी 10 लाखांची रक्कम हस्तगत केली, तर नीलेश रामदास म्हात्रे, उदय तानाजी शिंदे आणि रोशन उमाशंकर पाठक फरारी असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली. याप्रकरणी सुहास दशरथ हांडे (31) यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. 

असा केला अपहार 

संगणक आणि हार्डडिस्कद्वारे व्यक्‍तिगत कर्जाची रक्कम बॅंकेत खात्यांवर आलेल्या रकमेचा खुलासा झाला आहे. कर्जदारांच्या खात्यातून दलालांच्या खात्यात पैसे वळते केल्याचा पुरावा तसेच कर्जदारांचे जबाब नोंदवले आहेत. या कर्जदारांची काही माहिती घेऊन त्यांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांच्या बनावट दस्तावेजाच्या आधारे कर्ज काढून त्याचे कमिशन आपल्या खात्यावर वळवल्यानंतर रक्कम वाटून घेत होते. 

36 कर्जदारांचा शोध सुरू 

व्यक्‍तिगत कर्जदारांपैकी 36 कर्जदार अद्यापही मिळून आलेले नाहीत. ते राहत्या घराचा पत्ता बदलून दुसरीकडे पळून गेल्याने ते आरोपींचे साथीदार असण्याची शक्‍यता आहे. 

हस्तगत व शिल्लक रकमेचा लेखाजोखा 

रोहित भावसार याच्याकडून 1 लाख 74 हजार, चेतन शेरे 4 लाख, नितीन घाडीगावकर 7 लाख 50 हजार, प्रशांत कीर 15 लाख 52 हजार 800, सईद शेख 9 लाख, रवींद्र ठाकूर 20 लाख 57 हजार, फरारी नीलेश म्हात्रे 16 लाख 70 हजार 800, उदय शिंदे 4 लाख आणि रोशन पाठक 2 लाख 25 हजार असा 81 लाख 29 हजार 600 रुपयांची रोकड हस्तगत होणे बाकी आहे. तशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.  
 

Web Title: Axis Bank Fraud Case 7 Peoples have been arrested