तराफा तुटला, पण ९५ जण वाचले

तराफा तुटला, पण ९५ जण वाचले
तराफा तुटला, पण ९५ जण वाचले

ठाणे : तानसा येथील मतदान केंद्रावर मतदान करून तानसा धरणाच्या पाण्याच्या साठ्यावरून तराफाच्या साह्याने बोराळा येथील घराकडे परतणाऱ्या ९५ मतदारांचा तराफा अचानक तुटल्याने सर्व मतदार पाण्यात पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता घडली. याचवेळी तानसा धरणात मासे पकडायला आलेल्या मच्छीमारांनी व तराफातील लोकांनी तत्काळ पाण्यात उड्या मारून बुडणाऱ्या लोकांचे प्राण वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली; मात्र यातील सातहून अधिक मतदार किरकोळ जखमी झाले आहेत. 

शहापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक ८८ मधील बोराळा गावातील मतदारांना मतदान करण्यासाठी तानसा धरणाच्या पाण्यातून यावे लागते. बोराळा हे गाव तानसा अभयारण्यात वसलेले असून या लोकांना अघई-शहापूर येथील बाजारपेठेत तसेच मुंबईला ये-जा करण्यासाठी दररोज तानसा धरणातून तराफ्यावरून प्रवास करावा लागतो. त्यासाठी येथील रहिवाशांनी वर्गणी काढून लाकडी तराफा बनवला असून, त्याखाली प्लास्टिक ड्रम आहेत. बोराळा येथील रहिवाशांना दररोज पाण्यातून जाताना २० ते २५ मिनिटे लागतात. रस्त्याने जायचे असल्यास त्यांना पेंढरी किंवा दहिगाव येथे येण्यासाठी १२-१३ कि.मी.चा फेरा पायी मारावा लागत असल्याने ते या तराफ्याचा वापर करतात. 

येथील लोकांना ये-जा करण्यासाठी कुठलाही पर्यायी रस्ता नसल्याने उन्हा-पावसात त्यांना चिखल तुडवत १०-१२ कि.मी. रोज चालावे लागते. कोणी आजारी पडले तर त्या रुग्णाला कावड बनवून त्याच्या साह्याने रुग्णालयात आणावे लागते. त्यामुळे येथील लोकांना ये-जा करण्यासाठी सरकारने तात्काळ रस्ता बनवावा, अशी मागणी सीपीएमचे जिल्हा सदस्य सुनील करपड यांनी केली आहे. 

रणरागिणीने वाचवले ५ वर्षीय मुलाचे प्राण 
या घटनेत मधुकर अंधेर, बाबू माडा, संदेश मोर, सीताराम कडू, चंदुरा अंधेर, सुदाम कानल व आशा अंधेर आदी लोक जखमी झाले आहेत. तराफा तुटल्यावर त्यामधील रोहित नावाचा पाच वर्षांचा मुलगा पाण्यात वाहून जात असतानाच आशा अंधेर या महिलेने आपल्या जीवाची बाजी लावून त्याला वाचवल्याने गावकऱ्यांनी तिचे आभार मानले. त्यात काही महिलांना पोहता येत असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com