बाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा

भाग्यश्री भुवड
Saturday, 31 October 2020

जोगेश्‍वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्ते व सुविधा मिळाव्यात यासाठी भारतीय कामगार सेना पुढे सरसावली आहे;

मुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते, ते अद्याप मिळत नसल्याचे समोर येत आहे. जोगेश्‍वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्ते व सुविधा मिळाव्यात यासाठी भारतीय कामगार सेना पुढे सरसावली आहे; मात्र येथील कंत्राटी कामगार या वर्षीही दिवाळी बोनसशिवाय जाणार का, असा सवाल उपस्थित करत आहेत. 

मुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज 

येथील कंत्राटी कामगारांच्या दैनंदिन भत्त्यासाठी भारतीय कामगार सेनेने प्रभाग समिती अध्यक्षांना निवेदन दिले आहे. बाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्र कोव्हिड रुग्ण उपचारासाठी पालिकेने खुले केले. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने परिपत्रक जारी करून कंत्राटी कामगारांना 300 रुपये दैनंदिन भत्ता लागू केला; मात्र हा भत्ता कोणत्याही कामगाराला अद्याप मिळाला नाही. शिवाय जून 2019 ते जून 2020 या वर्षभरात कामगारांच्या पगारातून पीएफ अथवा ईएसआयसीसाठी वजा केलेली रक्कम अद्याप योग्य ठिकाणी भरली नाही. मागील वर्षाचा बोनसही दिला नाही, अशी नाराजी भारतीय कामगार सेनेने व्यक्त केली. या प्रकरणात लक्ष देऊन कंत्राटी कामगारांच्या हक्काचे पैसे मिळवून द्यावेत, असे निवेदन के पूर्व प्रभाग समिती अध्यक्षांना देण्यात आले आहे. 

Balasaheb Thackeray Trauma Center contract workers waiting for allowances

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thackeray Trauma Center contract workers waiting for allowances