मुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज 

समीर सुर्वे
Saturday, 31 October 2020

कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुंबई : कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात सात स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत. प्रत्येक प्रभागात तीन ते चार निरीक्षक कार्यरत आहेत. कोव्हिड काळात त्यांची संख्या वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.

शाळाबाह्य बालकांसाठी एक गाव, एक बालरक्षक मोहीम; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची संकल्पना

नर्सिंग होम, उपाहारगृह, कम्युनिटी किचन्स, डेअरी, पिठाच्या गिरण्या, केशकर्तनालय, लॉण्ड्री, औषधांची दुकाने आदी ठिकाणी नियमानुसार स्वच्छता ठेवली जात आहे की नाही, हे तपासण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वच्छता निरीक्षकाची असते. मात्र, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात तीन वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आणि चार स्वच्छता निरीक्षक कार्यरत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागाच्या आरोग्य विभागात एक वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आणि दोन ते तीन स्वच्छता निरीक्षक कार्यरत असतात. 

मुंबईत 1 हजार 416 नर्सिंग होम असून 87 हजारांच्या आसपास हॉटेल आहेत. त्याचबरोबर तेवढ्याच प्रमाणात डेअरी, पिठाच्या गिरण्या, केशकर्तनालय, लॉण्ड्री आणि औषधांची दुकाने आहेत. कोव्हिड काळात सर्व ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यात नर्सिंग होमची स्वच्छता तर सर्वात महत्त्वाची आहे. मात्र, अपुऱ्या निरीक्षकांमुळे स्वच्छतेची देखरेख कशी होणार, हा प्रश्‍न आहे. त्याबाबत पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. 

मॅटचे काम ऑनलाईन करण्यासाठी याचिका; उच्च न्यायालयाचे खुलासा करण्याचे निर्देश

पालिकेच्या अनेक विभागांमधील पदांची निर्मिती काही दशकांपूर्वी झाली. तेव्हाच्या लोकसंख्येनुसार पदे निर्माण केली गेली आहेत. त्यामुळे सध्याच्या लोकसंख्येनुसार ती अपुरीच असतात. सर्वाचा ताण कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पडतो, असे पालिकेच्या एका निवृत्त सहाय्यक आयुक्ताने सांगितले. 

21 अन्न निरीक्षक पुरेसे 
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात 21 अन्न निरीक्षक कार्यरत आहे. मात्र, आता खाद्यपदार्थांची तपासणी करून त्याबाबत कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेकडे राहिली नसून ती अन्न व औषध प्रशासनाकडे आहे. पालिकेचे अन्न निरीक्षक अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करतात. त्यामुळे त्यांची संख्या कमी असली तरी त्याचा फारसा परिणाम कामकाजावर होत नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 
------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inadequate Sanitation Inspector to Mumbai Municipal Corporation The need to increase the number during the covid period