वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प : 104 झाडांची कत्तल होणार? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

 वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 104 झाडांची कत्तल होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने (एमएसआरडीसी) मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे.

मुंबई - वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 104 झाडांची कत्तल होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने (एमएसआरडीसी) मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. नागरिकांनी 16 मेपर्यंत या प्रस्तावावर आक्षेप-हरकती नोंदवाव्यात, असे आवाहनही एमएसआरडीसीने केले आहे. 

या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर खारफुटींचीही कत्तल होणार असल्याने पर्यावरणवादी झोरू बोथना यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने जुहू किनाऱ्यावर कास्टिंग यार्ड उभारण्याबाबत एमएसआरडीसीला परवानगी नुकतीच फेटाळली आहे. त्यातच आणखी पुन्हा 104 झाडांची कत्तल करण्याची परवानगी वृक्ष प्राधिकरणाकडे मागितल्याने पर्यावरणवादी संघटनांनी त्यास विरोध दर्शवला आहे. 

एमएसआरडीसीने वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार वांद्रे-कार्टर रोड, वर्सोवा परिसरातील सात बंगला (नाना-नानी पार्कजवळ), जुहू कोळीवाडा आणि सांताक्रूझ पश्‍चिमेकडील सुनील दत्त गार्डन या परिसरातील वृक्ष तोडण्यात येणार आहेत. त्यातील 58 वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. 

पर्यावरणवादी संस्था कोर्टात जाणार 
या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याकडून परवानगी घेतेवेळी एमएसआरडीसीने तिवरांची कत्तल होईल असे स्पष्ट केले होते; मात्र या प्रकल्पासाठी वृक्षतोड करावी लागणार असल्याचे नमूद नव्हते. ही परवानगी न मिळवताच एमएसआरडीसीने वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे काम सुरू केल्याचा आरोपही पर्यावरणवादी संस्थांनी केला आहे. एमएसआरडीसीच्या प्रस्तावाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णयही या संघटनांनी घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bandra-Versova Sea Link project is expected to complete in breaking around 104 trees