बंजारा समाजही आरक्षणासाठी मैदानात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुंबई - मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरू असताना आता बंजारा समाजानेही भटक्‍या विमुक्‍त प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. गेली कित्येक वर्षे भटक्‍या विमुक्तांत बंजारा समाज आरक्षणाची मागणी करत असून, सरकारचे या समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. यासाठी उद्या (ता. 7) आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार राठोड यांनी केली आहे.

उन्नत व प्रगत गट (क्रिमिलिअर) मधून भटके विमुक्त, बारा बलुतेदार यांना वगळण्याची मागणी मागील चार वर्षांपासून बंजारा समाज करत आहे.

विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशानात विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना, मंत्र्यांनी एका महिन्यात निर्णय घेऊ असे वारंवार आश्वासन दिले, पण ते पाळले गेले नाही, असा आरोप करत बंजारा समाजदेखील आता स्वतंत्र आरक्षणाच्या लढ्यासाठी मैदानात उतरत असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले.

Web Title: banjara society agitation for reservation haribhau rathod