महाडमधील बॅंकांचे व्यवहार ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

महाड शहरात मंगळवारी आलेल्या पुराने हाहाकार माजवला. पुराच्या पाण्याने काही ठिकाणी आठ-दहा फुटाची पातळी गाठली होती. यामुळे दुकाने, बैठी घरे, जुन्या इमारतीमधील पहिला मजला यामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि बॅंक ऑफ इंडिया या दोन्ही राष्ट्रीयीकृत बॅंका पाण्याखाली आल्या होत्या.

महाड (बातमीदार) : शहरातील स्टेट बॅंक आणि बॅंक ऑफ इंडिया या दोन्ही राष्ट्रीयीकृत बॅंकांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यामुळे त्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. स्टेट बॅंकेची सुमारे चार लाख रुपयांची रोख रक्कम भिजली. 
महाड शहरात मंगळवारी आलेल्या पुराने हाहाकार माजवला. पुराच्या पाण्याने काही ठिकाणी आठ-दहा फुटाची पातळी गाठली होती. यामुळे दुकाने, बैठी घरे, जुन्या इमारतीमधील पहिला मजला यामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि बॅंक ऑफ इंडिया या दोन्ही राष्ट्रीयीकृत बॅंका पाण्याखाली आल्या होत्या. त्यामुळे दोन्ही बॅंकांचे व्यवहार ठप्प झाले. बॅंकांमधील कागदपत्रे, संगणकीय यंत्रणेचे नुकसान झाले. स्टेट बॅंक ऑफ इंडियाची सुमारे 4 लाखांची रोख रक्कम पाण्यात भिजली आहे; तर पंधरा लॉकर, इतर संगणकीय यंत्रणा बंद पडली आहे. यामुळे ही बॅंक किमान आठवडाभर बंद राहण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती बॅंकेचे सर्व्हिस व्यवस्थापक महेंद्र कपडेकर यांनी दिली. 
बॅंक ऑफ इंडियामधील कर्मचाऱ्यानीं बॅंकेतील काही सामान सुरक्षित स्थळी हलवले. त्यामुळे बॅंकेतील काही यंत्रणा सुरक्षित राहिली. बॅंकेचा कारभार दोन दिवसांतच सुरू होण्याची शक्‍यता बॅंक अधिकारी सतीश पाडावे यांनी वर्तवली. शहरातील काही खासगी बॅंकांनाही पुराचा फटका बसला आहे. महाडमधील मुरली मनोहर सहकारी बॅंकेच्या शिवाजी चौक शाखा, अण्णासाहेब सावंत महाड को-ऑप. अर्बन बॅंकेतदेखील पाणी शिरल्याचे समजते.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank closed in Mahad