मिरा-भाईंदरमधील भाजपमध्ये बॅनरवॉर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

माजी महापौरांकडून आमदारांची तक्रार

मिरा रोड ः ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मिरा-भाईंदर भाजपमध्ये पुन्हा एकदा गटबाजी सुरू झाली आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी आपले बॅनर काढल्याचा आरोप भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनी केला आहे. आमदार मेहता आणि माजी महापौर जैन यांच्यात विधानसभेच्या उमेदवारीवरून वाद सुरू झाला आहे. जैन यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे शहरात अनेक ठिकाणी बॅनर लावले होते. ते आमदार मेहता यांनी काढून पक्षविरोधी काम केल्याची तक्रार जैन यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. 

मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून गीता जैन  आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये उघडपणे संघर्ष सुरू आहे. दरम्यान भाजपच्या काही नगरसेवकांचा छुपा पाठिंबा गीता जैन यांना आहे, तर मेहता यांच्यावर अनेक नगरसेवक नाराज असले, तरीही उघडपणे त्यांच्याविरोधात कोणीही पुढे येत नाही. गीता जैन यांनी शहरात गणपतीच्या शुभेच्छांचे बॅनर नियमानुसार लावले होते.

त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने ते बॅनर काढले. याबाबत जैन यांनी ठेकेदाराला विचारले असता, त्याने मेहता यांचे नाव सांगितले. मेहता यांचीही या होर्डिंग कंपनीत भागीदारी आहे. त्यामुळे होर्डिंग काढले, असे सांगण्यात आल्याचे गीता जैन यांनी सांगितले. पक्षाचे बॅनर मेहता यांनी काढल्यामुळे ते पक्षविरोधी काम करत आहेत. तसेच जे माझे होर्डिंग लावत आहेत, मला कार्यक्रमाला बोलावत आहेत, त्यांनाही धमकी दिली जात असल्याचा आरोप जैन यांनी केला आहे. 

वरिष्ठांकडे तक्रार
गीता जैन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मिरा-भाईंदरचे प्रभारी खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडे बॅनर काढल्याची तक्रार केली आहे. दरम्यान याप्रकरणी आ. नरेंद्र मेहता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bannerwar in BJP in Mira-Bhayander