पाम बीच मार्गाच्या सुशोभीकरणात मेट्रोचा अडथळा

पाम बीच मार्गाच्या सुशोभीकरणात मेट्रोचा अडथळा
पाम बीच मार्गाच्या सुशोभीकरणात मेट्रोचा अडथळा

नवी मुंबई : ‘क्वीन नेकलेस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गाच्या सुशोभीकरणात मेट्रो रेल्वेचा अडथळा निर्माण झाला आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो रेल्वेने जोडण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरिता पाम बीच मार्गावरून मेट्रोचे जाळे तयार केले जाणार आहे. त्यासाठी पाम बीच मार्गाच्या दुभाजकांमध्ये मेट्रोचे खांब उभारले जाणार असल्याने, या मार्गावर केले जाणारे सुशोभीकरण वाया जाऊ नये, म्हणून महापालिकेने एमएमआरडीएकडे अभिप्राय मागवला आहे.

सुमारे ६ कोटी रुपये खर्च करून सीबीडी-बेलापूर येथील किल्ले गावठाणासमोरील महापालिका मुख्यालयापासून ते अगदी पाम बीच मार्ग संपेपर्यंत सहा टप्प्यात विविध रंगांची आणि सुवासिक फूलझाडांची लागवड केली जाणार आहे. महापालिका मुख्यालय ते एनआरआय सिग्नल, एनआरआय सिग्नल ते टी.एस. चाणक्‍य, टी.एस. चाणक्‍य ते नेरूळ सारसोळे सिग्नल, नेरूळ सिग्नल ते सानपाडा मोराज सर्कल, मोराज सर्कल ते अरेंजा कॉर्नरपर्यंतच्या दुभाजकांवर अशा विविध टप्प्यात रंगीत फूलझाडे व काही भागात सुवासिक फूलझाडे लावण्यात येणार आहेत. त्याकरिता उद्यान विभागातर्फे निविदा मागवण्यास सुरुवात झाली आहे; मात्र विमानतळाला जोडणारी भविष्यातील मेट्रो पाम बीच मार्गावरून मुंबईत जाणार असल्याने सध्या पाम बीच मार्गावर केला जाणारा सुशोभीकरणाचा खर्च वाया जाऊ  नये, याकरिता कायकरावे, असा प्रश्‍न पालिका प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे महापालिकेने एमएमआरडीएकडे या प्रकल्पाबाबत अभिप्राय मागवला आहे.

नवी मुंबईत सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला भविष्यात मुंबईतील विमानतळाशी जोडण्याचे नियोजित आहे. मेट्रो रेल्वे सुविधेने दोन्ही विमानतळ एकमेकांना जोडले जाणार असल्याने हे काम पाम बीच मार्गावरून जाणार आहे. यात महापालिकेतर्फे केला जाणारा सुशोभीकरणाचा प्रकल्प राबण्याचा प्रस्ताव असल्याने त्याबाबत एमएमआरडीएकडून अभिप्राय मागवला आहे.
-नितीन काळे, उपायुक्त, उद्यान विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com