मुंबई महापालिका नॉन कोविड रुग्णांना देणार 'ही' लस, पुढल्या आठवड्यात सुरु होणार नवीन प्रयोग

मुंबई महापालिका नॉन कोविड रुग्णांना देणार 'ही' लस, पुढल्या आठवड्यात सुरु होणार नवीन प्रयोग

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक बीसीजी लस टोचण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पुढील आठवड्यापासून काही व्यक्तींवर प्रयोग करण्यात येणार असून नॉन कोविड रूग्णांना ही लस टोचून प्रयोग करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रतिकारासाठी बीसीजी लस परिणामकारक ठरते का, हे तपासण्यासाठी वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. बीसीजी लस ही क्षयरोग प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरली जाते.

मुंबईतील कोरोना संसर्ग नियंत्रणात दिसत असला तरी संपूर्ण आटोक्यात आलेला नाही. दररोज साधारणाता 800 ते 1200 नवे बाधित रूग्ण सापडत आहेत. जोपर्यंत कोरोनावर लस सापडत नाही तोपर्यंत कोरोना पूर्णतः आटोक्यात आणणे देखील शक्य होणार नाही. त्यामुळे या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने क्षयरोगावरील बीसीजी लसीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरूवातील 60 व्यक्तींवर बीसीजी लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे.

यासाठी निरोगी खास करून नॉन कोविड व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. लस टोचण्याआधी या व्यक्तींची शारिरीक तपासणी केली जाईल. लस टोचल्यानंतर या व्यक्तीना निरिक्षणाखाली ठेऊन त्यांच्यावरील कोविड विषाणूंचा परिणामा बाबत निरिक्षण केले जाईल. सुरूवातील या लसीचा प्रयोग केईएम परिसरातील व्यक्तीवर करणार असल्याची माहिती पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

कोरोनाची लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. ब्रिटेन, अमेरिका, चीन आणि रशिया लसीच्या परिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. जोपर्यंत  कोरोनाची लस विकसित होत नाही तोपर्यंत गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. यानुसार क्षयरोग प्रतिबंधात्मक बीसीजी लसीचा वापर करण्यात येणार आहे. बीसीजी लसीने कमीत कमी पहिल्या 30 दिवसात पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाचा वेग कमी करू शकतो असा अंदाज आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या परवानगीने आम्ही बीसीजी प्रतिबंधात्मक लसीचा प्रयोग काही नॉन कोविड रूग्णांवर करणार आहोत. पुढील आठवड्यात या प्रयोगाला सुरूवात होईल,याचे ठोस निष्कर्ष यायला दोन ते ति महिन्यांना कालावधी लागू शकतो. - डॉ. दक्षा शाह , उप कार्यकारी आरोग्य अधिकारी 

भारत आणि चीनमध्ये बीसीजीचे राष्ट्रीय लसीकरण अभियान सुरुवातीपासून आहे. यामुळेच कोरोनाचा मृत्यूदर या देशांमध्ये कमी असल्याचे सांगितले जाते.बीसीजी लसीमुळे कोरोना विषाणूंशी निगडीत असलेल्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी मदत होते. बीसीजीची लस जन्मल्यानंतर 15 दिवसांच्या आत लहान मुलांना दिली जाते. त्यामुळे संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. भारतातही कोरोना रुग्णांवर बीसीजी लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरू केले आहे. 

काय आहे बीसीजी लस : 

बॅसिलस काल्मेट गेरिन अर्थात बीसीजी ही लस क्षयरोगाच्या (टीबी रोग) प्रतिबंधासाठी बालकांना दिली जाते. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस या जीवाणूंमुळे मनुष्यात क्षयरोग उद्भवतो, तर मायकोबॅक्टेरियम बोव्हिस जीवाणूंमुळे जनावरांना क्षयरोग होतो. अल्बर्ट काल्मेट आणि कमीला गेरिन या शास्त्रज्ञांनी ही लस तयार केली म्हणून या लसीला बॅसिलस काल्मेट-गेरिन असे नाव दिले गेले आहे. ही लस मायकोबॅक्टेरियम बोव्हिस जातीच्या जीवंत जीवाणूंना दुबळे करून (म्हणजे अर्धवट मारून) बनवलेली जीवंत-क्षीणित स्वरूपाची लस आहे.

बीसीजी लसीकरण करणा-या देशांत कोरोना बाधित रुग्ण आणि त्यामुळे झालेले मृत्यू यांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. डेन्मार्कमध्ये स्टेटन्स सीरम इन्स्टिट्यूट असून तेथे संपूर्ण जगासाठी बीसीजी लस तयार केली जाते आणि स्वत:च्या देशातील बालकांसाठी वापरली जाते. त्यामुळे डेन्मार्कमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी असून लगतच्या बेल्जियम आणि नेदरलँड्‌स देशांत त्याचा अधिक प्रभाव असल्याचे दिसले. कोरोनाच्या काळात, काही देशांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी बीसीजी लस परिणामकारक ठरते का हे तपासण्यासाठी वैद्यकीय चाचण्या  सुरू केलेल्या आहेत; भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद देखील यांवर लक्ष ठेवून आहे. 

( संकलन - सुमित बागुल )

bcg vaccine to be given to non covid patients new research will be conducted by bmc


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com