पाणीपुरी, भेळपुरीच्या गाड्या खुणावतायत ? मसाला डोसे आठवतायत ? थांबा, आधी ही बातमी वाचा

पाणीपुरी, भेळपुरीच्या गाड्या खुणावतायत ? मसाला डोसे आठवतायत ? थांबा, आधी ही बातमी वाचा

मुंबई : मिशन बिगिन अगेन सुरुवातीसोबतच पावसाने सुद्धा जोर धरला असून पावसाळ्यातील रोगराईंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. यामध्ये पाण्यावाटे सर्वाधिक पसरणाऱ्या पाच आजारांमध्ये अतिसार (डायरिया), हिवताप (मलेरिया), विषमज्वर (टायफॉइड), कॉलरा आणि फिलेरियोसिस (फिलेरिया कृमींच्या संसर्गामुळे होणारा आजार) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कावीळ, सर्दी, ताप, डेंग्यु आणि विविध प्रकारचे फुफ्फुसांचे विकार (न्युमोनिया) आढळून येतात. त्यामुळे, कोरोना काळात पोटदुखी आणि जुलाबाची लक्षणं दिसत असतील तर कोरोनाची चाचणी करणे महत्वाचे आहे. 

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरच्या पोटविकारतज्ञ डॉ सोनाली गौतम सांगतात," कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाला प्रामुख्याने जी सर्वसाधारण लक्षणं दिसून येत आहेत ती लक्षणं काही रुग्णांमध्ये दिसत नाहीत. पोटदुखी आणि डायरिया असलेल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याच्या काही केसेस राज्यात दिसून येत आहेत म्हणूनच पावसाळ्यातील पोटदुखी आता डॉक्टरांची डोकेदुखी ठरणार आहे." 

तोंडावर ठेवा आळा -

कोरोना संकटाच्या महामारीत हा पावसाळा ऋतू अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अनेक महिन्यांनी घराबाहेर पडल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरी, भेळपुरीच्या गाडया, मसाला डोशांचा वास आपल्याला खुणावू शकतो परंतु रस्त्याकडेच्या गटारातून वाहत असलेले पाणी, आजूबाजूला होत असलेला चिखल, त्या चिखलावर बसून मग गाडय़ांवरील पदार्थावर बसणाऱ्या माशा, उघडे ठेवलेल पाणी. हे सर्व वास्तव नजरेआड करू नका.

दूषित पाण्याचा स्रोत हा सगळीकडून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पाऊस पडत असल्याने तहान कमी होत असली तरी पाऊस नसताना मात्र उकाडा वाढतो, घाम बाहेर पडत असल्याने अनेकदा रस्त्यांवरील सरबताच्या गाडय़ांकडे पावले वळतात. त्याचप्रमाणे पोषक आहारासाठी फळांचे रस पिणारेही अनेक आहेत. फळांचा रस आरोग्यासाठी चांगला असला तरी हे रस तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी किंवा बर्फाचे खडे यांतून संसर्गजन्य आजारांचा फैलाव होतो.

प्रत्येकाची प्रतिकार क्षमता वेगळी असते. काहींना याचा लगेच त्रास होतो, काहींना होत नाही. मात्र, या कोरोना महामारीमध्ये काळजी सर्वानीच घ्यायला हवी. कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनीही दुखणं अंगावर काढू नका असा सल्ला यापूर्वी दिला होता. 

सतर्कता महत्वाची -

आताही कोव्हिड-19 वॉर्डमध्ये वैद्यकीय सेवा देत असलेले डॉक्टर वेळेत टेस्ट करा असंच सांगत आहेत. पोटदुखी, जुलाब ही कोरोनाची प्रमुख लक्षणं नसली तरी सतर्क रहायला हवं. त्या आजाराची औषध घेऊनही दोन ते तीन दिवसांत त्रास होणं थांबत नसेल तर कोरोनाची टेस्ट करुन घ्या." असं सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

take atmost care during monsoon because corona may spread from water

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com