बी.कॉम.ची परीक्षा आजपासून एकूण 63 हजार 398 विद्यार्थी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रांतील परीक्षांना बुधवारपासून (ता. 3) तृतीय वर्ष बी. कॉम. (सत्र 6) च्या परीक्षेपासून सुरुवात होत आहे. ही परीक्षा 25 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रांतील परीक्षांना बुधवारपासून (ता. 3) तृतीय वर्ष बी. कॉम. (सत्र 6) च्या परीक्षेपासून सुरुवात होत आहे. ही परीक्षा 25 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील 63 हजार 398 विद्यार्थी सात जिल्ह्यांतील 396 केंद्रांवर ही परीक्षा देणार आहेत. 

पुनर्परीक्षार्थी व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्रातील काही परीक्षा मार्चमध्ये सुरू झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील या महत्त्वाच्या परीक्षेला दरवर्षी सर्वांत जास्त विद्यार्थी बसतात. याच परीक्षेने विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांना सुरुवात होत आहे. तृतीय वर्ष बी.कॉम. (सत्र 6) सुधारित अभ्यासक्रमाचे 56 हजार 774 विद्यार्थी परीक्षा देतील. त्यापैकी 29 हजार 958 मुली, तर 26 हजार 816 मुले आहेत. त्याचप्रमाणे 75:25 आकृतिबंधाचे 5551 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. 

ही परीक्षा मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर हे जिल्हे आणि सिल्वासा हा केंद्रशासित प्रदेश अशा 396 केंद्रांवर होईल. ही परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होऊन दुपारी 1.30 वाजता संपेल, अशी माहिती परीक्षा विभागातील अधिकाऱ्याने दिली. परीक्षा वेळेवर सुरू करून निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य असेल, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. 

अभ्यासक्रमाची पुनर्रचना 
2019-20 या शैक्षणिक वर्षापासून बी. कॉम. अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. अभ्यासक्रमातही सुधारणा करण्यात आली आहे. या परीक्षेपासून तृतीय वर्ष बी.कॉम. सत्र 6 मध्ये सहा विषय असतील. या परीक्षेची प्रश्‍नपत्रिका 100 गुणांची असेल. दोन विषयांच्या परीक्षा व मूल्यांकनाची जबाबदारी महाविद्यालयांकडे आहे.

Web Title: B.Com Exam from today