‘बीकेसी’च्या धर्तीवर लवकरच ‘केसीपी’

सकाळ वृत्‍तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

कॉर्पोरेट पार्कचे नियोजन अंतिम टप्प्यात;  १२० हेक्‍टर जागेवर सिडकोचा प्रकल्‍प

खारघर : सिडकोने सेंट्रल पार्क आणि गोल्फ कोर्सशेजारी बीकेसीच्या धर्तीवर  खारघर कॉर्पोरेट पार्क (केपीसी) १२० हेक्‍टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉर्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय जानेवारी २०१६ मध्ये घेतला होता. अखेर गेले पाच वर्ष रखडलेल्‍या पार्कचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून नागरिकांमधील  उत्सुकता अखेर संपुष्टात आली आहे. या प्रकल्पाची निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सिडको अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली. त्‍यामुळे खारघरच्या सौदर्यात आणखी भर पडणार आहे.

हे पण वाचा ः  फणसाडमधील ट्रॅप कॅमेरे लंपास 

सिडकोने खारघर वसाहत उभारल्यावर गोल्फ कोर्स तसेच लंडन येथील हाईड पार्कच्या धर्तीवर आधारित सेंट्रल पार्क उभारले. तसेच १० वर्षांपूर्वी हाती घेतलेले बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू असून डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो सुरू करण्यासाठी सिडको प्रयत्नशील आहे. या प्रकल्पाबरोबरच बीकेसीच्या धर्तीवर खारघरमध्ये उभारण्यात येणाऱ्या कॉर्पोरेट पार्कसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सात वास्तुविशारद आराखडा तयार करीत आहेत. हे पार्क बीकेसीपेक्षा वेगळे असणार आहे.

हे पण वाचा ः नेरळ परिसरात गुटखा विक्रीचा सुळसुळाट 

प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी सिडकोने सात वास्तुविशारदांना अंतिम आराखडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापैकी एका उत्कृष्ट वास्तुविशारद व सल्लागार कंपनीची निवड करण्यासाठी सिडकोने पाच तज्ज्ञांची एक समिती गठित केली होती. या समितीने सिंगापूरच्या ईडीबी डिझायनर या कंपनीच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार प्रस्तावित कार्पोरट आराखडा तयार करण्यासाठी ईडीबी डिझायनर या कंपनीची गेल्या वर्षी नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने कॉर्पोरट पार्कचा अत्याधुनिक स्वरूपाचा आराखडा तयार करून सिडकोला नुकताच सादर केला आहे. त्यानुसार या पार्कमध्ये कार्यालय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना पाचारण केले जाणार आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे.

या देशातील वास्तुविशारदांचा समावेश 
खारघर कॉर्पोरट पार्कसाठी देशविदेशांतील २४ वास्तुविशारदांनी स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील सात वास्तुविशारदांच्या आराखड्यांना सिडकोने पंसती दिली. यात सिंगापूर, नेदरलॅंड, अमेरिका, इंग्लड, फ्रान्समधील वास्तुविशारदांचा समावेश असून मुंबई, बेंगळूरु आणि नवी दिल्लीतील काही वास्तुविशारदांनी परदेशी वास्तुविशारद समूहांबरोबर सामंजस्य करार करून आराखडे सादर केले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beautiful emphasis will be placed on the Kharghar