esakal | लॉकडाउनमुळे महाराष्ट्राचं ८२ हजार कोटीचं नुकसान

बोलून बातमी शोधा

Industry
लॉकडाउनमुळे महाराष्ट्राचं ८२ हजार कोटीचं नुकसान
sakal_logo
By
कृष्णा जोशी ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई: सध्याच्या लॉकडाउनमुळे व कडक निर्बंधांमुळे देशाचे किमान दीड लाख कोटी रुपयांचे नुकसान होईल व त्यातील राज्याचे नुकसान किमान 82 हजार कोटी रुपये राहील असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. यासंदर्भात बँकेने तयार केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या निर्बंधांमुळे औद्योगिक उत्पादनात तसेच सकल राष्ट्रीय उत्पन्नातही घट होण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. जीडीपी 10 ते 14 टक्के कमी होण्याचा अंदाज आहे.

लॉकडाउनमुळे घटणारे औद्योगिक उत्पादन तसेच बुडणारा महसूल, कमी होणारी निर्यात याचा विचार करून हा नुकसानीचा अंदाज काढण्यात आला आहे. यातील सुमारे ऐंशी टक्के नुकसान महाराष्ट्र, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांचे होईल. महाराष्ट्र हे औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या पुढारलेले राज्य असल्याने महाराष्ट्रालाच जास्त फटका बसण्याची भीती आहे.

लॉकडाउनच्या भीतीमुळे महाराष्ट्रातून स्थलांतरित मजूर मोठ्या संख्येने आपल्या मूळगावी गेल्यामुळेही येथील उद्योग व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. पश्चिम रेल्वेवरून सव्वाचार लाखांपेक्षाही जास्त मजूर उत्तर भारतात परत गेले. त्यातील सव्वातीन लाख मजूर फक्त उत्तर प्रदेश व बिहारला परत गेले, तर मध्यरेल्वेने पावणेपाच लाख नागरिक उत्तर भारतात परत गेले.

हेही वाचा: अनिल देशमुख ही मोगलाई नाही - जयश्री पाटील

तर बँकेच्या बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्समध्येही या काळात घसरण झाली आहे. म्हणजेच औद्योगिक उलाढालही कमी झाल्याचा अंदाज आहे. मागीलवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात हा निर्देशांक 85.7 होता, त्यानंतर सलग पाच महिने तो वाढला होता, पण आता एप्रिलमध्ये तो पुन्हा 86.3 वर आला आहे. आरटीओला मिळणारा महसूल, मंडयांमध्ये होणारी अन्नधान्याची आवक तसेच प्रवासाची साधने या सर्व बाबींमध्ये मोठी घट झाल्याचेही यातून दिसते आहे.

हेही वाचा: BMC च्या वॉर रुम्समध्ये २१ दिवसात ७४ हजारपेक्षा जास्त फोन कॉल्स

बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जांमध्येदेखील गेल्या वर्षापासूनच्या लॉकडाऊनमुळे घट होत आहे. ही घट गेल्या साठ वर्षांत सर्वात जास्त आहे. मागीलवर्षी कर्जे देण्याचे प्रमाण 6.1 टक्के वाढले होते, तर आता यावर्षी ही वाढ फक्त 5.6 टक्के एवढीच झाली. मागीलवर्षी ग्राहकांच्या ठेवींचे प्रमाण 7.9 टक्क्यांनी वाढले तर यावर्षी ते प्रमाण 11.4 टक्क्यांनी वाढले. म्हणजेच लॉकडाऊनकाळात लोकांनी पैसा खर्च न करता साठवून ठेवण्यावर भर दिल्याचेही अहवालात म्हटले आहे.