Begger
BeggerSakal

Begger : नवी मुंबई शहरात भिकाऱ्यांचे प्रमाण वाढले

सुनियोजित शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या नवी मुंबई शहरात कोविड काळानंतर अचानक भिकाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
Summary

सुनियोजित शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या नवी मुंबई शहरात कोविड काळानंतर अचानक भिकाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

नवी मुंबई - सुनियोजित शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या नवी मुंबई शहरात कोविड काळानंतर अचानक भिकाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे भिकाऱ्यांमध्ये लहान बालकांचा समावेश अधिक असून नवी मुंबई शहरातील रेल्वेस्थानकांवर भीक मागण्याच्या नावाखाली प्रवासी आणि महिलांचा पाठलाग करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे अशा भिकाऱ्यांवरील कारवाईकडे कानाडोळा करणाऱ्या प्रशासनाच्या धोरणांवर समाजसेवी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्यावर सिग्नलवर व रेल्वेस्थानकांच्या बाहेर भीक मागणारी अनेक मुले आणि समूह नजरेस पडतात. नवी मुंबई शहर आणि त्याचे विविध नोड्स त्याला अपवाद ठरले होते; परंतु काही वर्षांपासून नवी मुंबईतही ठिकठिकाणी हे समूह मुख्य चौक, रस्त्यालगतचे पदपथ, सिग्नल आणि रेल्वेस्थानकांबाहेरील मोकळ्या जागांमध्ये संसार थाटलेल्या अवस्थेत दिसत आहेत. शहरातील ट्रान्स हार्बर मार्गावर गेल्या चार वर्षांपासून कोपरखैरणे रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पदपथावर तर चक्क झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या झोपड्यांमधील मुले प्रवाशांच्या मागे लागून, अंगाजवळ खेटून हैराण करून भीक मागतात. तसे प्रशिक्षणच या लहान मुलांना दिले जात आहे. गरज पडल्यास ही मुले अगदी मागे-मागे जातात. तसेच जर भीक नाही दिली तर शिवीगाळ करण्याचेही प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे, हे प्रकार दिवसाढवळ्या होत असल्याने महिला प्रवाशांसोबत अनेकदा लाजिरवाणे प्रसंगही घडले आहेत.

या ठिकाणी सर्वाधिक वावर

वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, खारघर, पनवेल या मुख्य रेल्वेस्थानकांच्या बाहेर भिकाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. नवी मुंबईत वाशीतील सिग्नल, सायन-पनवेल महामार्गावर वाशी उड्डाण पुलाखालील सिग्नल, पामबीच मार्गावरील सिग्नल, सिडको भवन येथील सिग्नल या मुख्य सिग्नल यंत्रणेवरही भीक मागणाऱ्यांमध्ये बालकांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.

टोलफ्री क्रमांकावर प्रतिसादच नाही

बरेचदा हे लोक विविध रंगांचे फुगे, लहान मुलांची खेळणी, सणासुदीच्या काळात रंगीत एलईडी दिवे असणाऱ्या काचेच्या बाटल्या आदी वस्तू विक्री करताना दिसतात. पण त्या खरेदी करायच्या नसल्या तरीसुद्धा जबरदस्ती करतात. याबाबत चाईल्ड लाईन टोल फ्री क्रमांक १०९८ वर तक्रार केली असता कोणीही दखल घेत नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे रेल्वेस्थानकाबाहेर भीक मागणाऱ्या बालकांच्या समूहाबद्दल ‘वुई ॲण्ड अस फाऊंडेशन’ने महिला व बाल विकास विभाग ठाणे जिल्हा व नवी मुंबई महापालिकेला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या मुलांबद्दल प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, नाहीतर आत्ता भीक मागण्यासाठी पाठलाग करणारी मुले पुढे जाऊन गुन्हेगारी जगताकडे वळतील, अशी भीती आहे.

- तुषार अहिरे, अध्यक्ष, ‘वुई ॲण्ड अस फाऊंडेशन

पदपथावर राहणारी आणि सिग्नलवर भीक मागणाऱ्या या समूहांवर कारवाई करण्यासाठी अनेकदा नवी मुंबई पोलिसांसोबत पत्रव्यवहार केला आहे. पोलिसांनी या मुलांना पकडून बालसुधारगृहात रवानगीही केली होती. मात्र त्या ठिकाणाहून सुटल्यानंतर ही मुले पुन्हा भीक मागण्याकडे वळत आहेत.

- दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com