राजकीय मोर्चेबांधणीला सुरवात
कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेली 27 गावे 2015 मध्ये राजकीय गणिते जुळविण्यासाठी सेना भाजपने पुन्हा भुमीपुत्रांचा विरोध डावलून पालिकेत समाविष्ट केली. या गावांच्या विकासासाठी 6500 कोटी रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या आधिवेशनात या गावांची नवीन नगरपालिका करण्याचे सुतोवाच केले.
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळलेली 27 गावे 2015 मध्ये राजकीय गणिते जुळविण्यासाठी सेना भाजपने पुन्हा भुमीपुत्रांचा विरोध डावलून पालिकेत समाविष्ट केली. या गावांच्या विकासासाठी 6500 कोटी रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या आधिवेशनात या गावांची नवीन नगरपालिका करण्याचे सुतोवाच केले. त्यामुळे सर्वपक्षीय संघर्ष समिती व युवा मोर्चा या माध्यमातून गावांसाठी एकत्र लढा देणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी व नेत्यांनी आता भविष्यातील नगरपालिका निवडणुकुसाठी कंबर कसून आपआपली ताकद वाढविण्यास सुरवात केली आहे.
यासाठीच कल्याण शीळ रस्त्यावर आता दररोज होणाऱ्या वाहतुक कोंडीचा मुद्दा हाती घेऊन संयम सुटण्याची वेळ आलेल्या नागरिकांसाठी रस्त्यावर उतरत आंदोलनाचा इशारा दिला आहे. सत्ताधारी सेना भाजपा या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागरिकांसाठी रस्त्यावर उतरुन उग्र आंदोलन करणार व या जटिल वाहतुक कोंडिला जबाबदार लोढा पलावा येथील माल बंद करण्याची मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली.
कल्याण-शिळ मार्गावरील वाहतूक कोंडीने उग्र स्वरूप धारण केले आहे.याला सर्वस्वी निळजे येथील लोढा पलावा आणि मॉल जबाबदार आहे.कुठल्याही प्रकारचे वाहतुकीचे नियोजन न करता लोढाने रस्त्यालगत मॉल उभारला आहे त्याचबरोबर गृहसंकुलात सुदधा मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे.मात्र वाहतुकीचे नियोजन मात्र करण्यात आलेले नाही.जो पर्यंत वाहतुकीचा प्रश्न निकाली निघत नाही तो पर्यंत तो मॉल बंद ठेवावा अशी मागणी राष्ट्रवादी करणार आहे.
27 गावांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकत्याच पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नेमणुका केल्या आणि मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन केले. एकीकडे वेळ पडल्यास मनसेचे दोन नगरसेवक 27 गावे वगळण्यासाठी राजीनामे देतील असे लाखी आश्वासन मनसे नेते प्रमोद (राजू) पाटील यांनी संघर्ष मोर्चाला दिले आहे.व दुसरीकडे पक्ष बळकटीवर जोर दिला आहे.
शिवसेनेच्या शाखा व पदाधिकारी या माध्यमातून व या भागाचे नेतृत्व करणारे खासदर डॉ.श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर यांच्या निधीतून व अमृत योजनेतून 27 गावांसाठी रस्ते, पाणी व आरोग्य याचबारोबर स्मशानभूमी, समाजमंदिर, वीज पुरवठा व मेट्रो तसेच वाहतुक प्रश्न सोडविण्यासाठी एलिवेटेड रोड व उड्डाणपुल यासाठी सातत्याने पाठपुरावा करुन नागरी सुविधा देण्यासाठी जोर लावला आहे.
2015 च्या पालिका निवडणुकींनंतर ग्रामिण भागात अनेक मातब्बरांनी भाजपात प्रवेश केल्याने व राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा ,जोरदार प्रचार करुन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपाही आपला पक्ष मजबूत करण्यासाठी जोर लावत आहे. कल्याण डोंबवली महानगर पालिकेचा भ्रष्ट कारभार अनेक उदहरणांमुळे जनते समोर येत आहे. त्यामुळे पालिका बरखास्त करावी व 27 गावे वगळून नवीन नगरपालिका करावी यासाठी प्रदेश सदस्य संतोष केणे हे याच ग्रामीण भागातील काँग्रेस समर्थकांना बरोबर घेऊन नेत्यांकडे जोरदार मागणी करीत आहेत.
27 गावे वगळून वेगळी नगरपालिका मागणारे सर्वपक्षीय नेते जर नगरपालिका निर्माण झाली तर मात्र आपलाच नगराध्यक्ष व्हावा व आपल्याच पक्षाची एकहाती सत्ता यावी व आपले वर्चस्व टिकून रहावे यासाठी नेते कसे कार्यरत आहेत हे दिसून येते.