बेलापूर-खारकोपर रेल्वे मार्ग धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बेलापूर-खारकोपर मार्गावर रुळाखालील माती वाहून गेली होती. ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करून दुर्घटना टाळण्यात आली. मात्र, त्यानंतरही रेल्वे प्रशासनाने या मार्गाची पाहणी करण्याची तसदी न घेतल्याने प्रवाशांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई : बुधवारी (ता. ४) झालेल्या अतिवृष्टीमुळे बेलापूर-खारकोपर मार्गावर रुळाखालील माती वाहून गेली होती. ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करून दुर्घटना टाळण्यात आली. मात्र, त्यानंतरही रेल्वे प्रशासनाने या मार्गाची पाहणी करण्याची तसदी न घेतल्याने प्रवाशांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
 
बुधवारी मुसळधार पावसामुळे सकाळच्या सुमारास बेलापूरजवळ रेल्वे मार्गावर रुळाखालील माती सरकल्याने या मार्गावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. चार ते पाच तासांच्या अवधीनंतर हा मार्ग पुन्हा सुरू करण्यात आल्याचा दावा रेल्वे प्रशासनामार्फत केला जात असला तरी प्रत्यक्षात गुरुवारी सकाळी या मार्गावरील सेवा सुरळीत झाल्याचे प्रवाशांमार्फत सांगण्यात येत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रुळाखाली मातीचा भराव करत, रुळांना आधारासाठी गोण्यांचा टेकू देण्यात आला. मात्र, या गोण्या पावसात कितपत टिकाव धरतील, ही तात्पुरती डागडुजी किती काळ टिकणार, असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण मार्गावर मातीचा भराव टाकून सपाटीकरण करून रेल्वे रूळ टाकण्यात आले आहेत. पहिल्या पावसातच अशी स्थिती उद्‌भवत असेल तर भविष्याचा विचारच करायला नको, असे मत उलवे येथील नीलेश कदम यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, या मार्गावर सेवा सुरू होऊन १० महिनेच होत आले आहेत. महामुंबईत होत असलेल्या अतिवृष्टीच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने सजग राहणे गरजेचे आहे.

अजूनही पावसाचा जोर ओसरलेला नाही. बुधवारच्या पाहणीनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुन्हा या मार्गाची पाहणी केल्याचे ऐकिवात नाही. जोपर्यंत मोठी दुर्घटना होत नाही, तोपर्यंत आपल्या प्रशासनाला जाग येत नाही. पावसाळ्यादरम्यान, जेथे असा भूस्खलनाचा धोका उद्‌भवण्याची शक्‍यता असते तेथे रेल्वे प्रशासनाकडून नियमित पाहणी होणे गरजेचे आहे. 
- छगन चाळके, रहिवासी, उलवे

बुधवारी चार-पाच तासांमध्ये पुन्हा बेलापूर-खारकोपर मार्गावरील सेवा सुरळीत करण्यात आली होती. आवश्‍यक दुरुस्ती पूर्ण झाली आहे. रेल्वे प्रशासनामार्फत रुळांची पाहणीही करण्यात आली आहे. प्रवाशांनी भीती बाळगू नये. 
- ए. के. जैन, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belapur-Kharkopar railway route dangerous