बेलापूरमधील रुग्णसेवेला संजीवनी

बेलापूरमधील रुग्णसेवेला संजीवनी
बेलापूरमधील रुग्णसेवेला संजीवनी

नवी मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून फक्त बाह्यरुग्णांना सुविधा देणारे महापालिकेचे बेलापूर येथील माता-बाल रुग्णालय १५ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी ३ स्त्री-रोगतज्ज्ञ, ३ बालरोगज्ज्ञ आणि २६ परिचारिका अशा एकूण ३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांसाठी आवश्‍यक असलेले इन्क्‍युबेटर, बेबी वॉर्मर आदी यंत्रे उपलब्ध केल्याने, लवकरच अतिदक्षता विभागही सुरू केला जाणार आहे. बेलापूर येथे पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरू झाल्याने, आता नेरूळ आणि वाशी येथील रुग्णालयांवर प्रसूतीसाठी महिला रुग्णांचा येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक म्हणून नावलौकिक असलेल्या नवी मुंबई पालिकेच्या प्रतिमेला साजेशा बेलापूर, नेरूळ, ऐरोली येथे रुग्णालयाच्या इमारती उभारल्या; मात्र या भव्य आणि आलिशान इमारतींमध्ये डॉक्‍टर आणि पुरेशी यंत्रसामग्री उपलब्ध न केल्याने ही रुग्णालये फक्त शोभेचीच ठरली आहेत. ५० खांटाच्या बेलापूर रुग्णालयात डॉक्‍टर उपलब्ध होत नसल्यामुळे, फक्त बाह्यरुग्ण विभाग सुरू होते; मात्र रुग्णालयात प्रसूती विभाग व आंतररुग्ण विभाग सुरू नसल्यामुळे सीबीडी-बेलापूर सिडको वसाहत, आग्रोळी, दिवाळे, शहाबाज येथील हजारो महिलांना प्रसूतीसाठी महापालिकेच्या नेरूळ व वाशी रुग्णालयात जावे लागत होते. या ठिकाणीही इतर रुग्णालयांचा ताण वाढत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे बेलापूर रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात होती. 

अखेर तत्कालीन आयुक्त रामास्वामी यांनी बेलापूर रुग्णालय सुरू करण्यासाठी डॉक्‍टरांची भरती केली. त्यानुसार बेलापूर रुग्णालयात प्रसूती विभाग सुरू करण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि परिचारिकांसहीत दोन वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच सिटीस्कॅन व सोनोग्राफी करण्यासाठी यंत्र सामग्रीही बसवण्यात आली आहे. येत्या १५ ऑगस्टच्या मुहुर्तावर हे रुग्णालय सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. 

वाशी रुग्णालयांवर ताण 
बेलापूर येथील माता-बाल रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दिवसाला १० ते १५ महिलांची प्रसूती केली जात आहे. या ठिकाणी महिन्याला तब्बल ३०० ते ३५० महिलांची प्रसूती केली जाते. वाशी रुग्णालयात प्रसूतीपूर्व महिलांसाठी ३० व प्रसूती झाल्यावर ४० अशा एकूण ७० खाटा उपलब्ध आहेत; तर अर्भकांसाठी अतिदक्षता विभागात १६ खाटा उपलब्ध आहेत. नेरूळ रुग्णालयातही १०० महिलांची महिन्याला प्रसूती होते. ऐरोली रुग्णालयात महिन्याला १०० ते १२० महिलांची प्रसूती केली जाते.

बेलापूरप्रमाणे लवकरच ऐरोली, तुर्भे व कोपरखैरणे येथील रुग्णालयातील समस्या लवकर सोडवण्यात येणार आहेत. या रुग्णालयांमध्ये टप्प्या-टप्प्याने डॉक्‍टर, परिचारिका व आवश्‍यक यंत्रसामग्री उपलब्ध केली जाणार आहे. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com