सानपाड्यातील उद्याने दिवसा बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

बेलापूर - नवी मुंबई शहर उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, सानपाडा सेक्‍टर ७ मधील सीताराम मास्तर व संत शिरोमणी ही उद्याने सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवली जातात. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होते; शिवाय बच्चे कंपनीचाही हिरमोड होतो. विशेष म्हणजे नेरूळ व सीवूडस्‌मधील अनेक उद्याने दिवसभर खुली असतात. त्यामुळे पालिकेचा प्रत्येक उद्यानासाठी वेगळा नियम आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

नवी मुंबई महापालिकेने शहरात अत्याधुनिक सोई-सुविधा असलेली २०० पेक्षा अधिक उद्याने विकसित केली आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. या उद्यानाचा वापर लहान मुले, तरुण व शहरातील ज्येष्ठ नागरिक करतात. परंतु, शहरातील अनेक उद्यानांच्या वापरावर वेळेची मर्यादा असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी आपला दिनक्रम बदलला आहे. सानपाडा सेक्‍टर ७ हा परिसर गजबजलेला आहे. या भागात ही दोनच उद्याने असल्याने ज्येष्ठ नागरिक, तरुण व लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर येथे वर्दळ असते. परंतु, काही महिन्यांपासून तेथे वेळेची मर्यादा घातल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. सानपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी सीताराम मास्तर उद्यानात येतात. साप्ताहिक व सार्वजनिक सुटीच्या काळात लहान मुलेही या उद्यानात येतात. परंतु, ती सकाळी ९.३० पासून सायंकाळी ५ पर्यंत बंद ठेवली जातात. त्यामुळे पालिकेने ही उद्याने कोणासाठी बनवली आहेत, असा सवाल नागरिक विचारत आहेत. इतर विभागांमधील उद्याने दिवसभर सुरू ठेवली जात असून, सानपाडा विभागासाठीच हा नियम का, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत.

पालिकेने शहरातील सर्व उद्यानांसाठी समान नियम ठेवणे गरजेचे आहे. उद्याने दिवसा बंद ठेवणे चुकीचे आहे. ज्येष्ठ नागरिक आणि सुटीच्या दिवशी लहान मुले विरंगुळा म्हणून उद्यानात येतात. दिवसा उद्याने बंद ठेवून नागरिकांना मूलभूत सुविधेतून वंचित ठेवण्याचा हा प्रकार काही महिन्यांपासून सुरू आहे. 
- भरत ठाकूर, रहिवासी, सानपाडा

शहरातील सर्वच उद्याने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवली जातात. ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाहीत, ती उद्याने सुरू राहत आहेत. लवकरच ती उद्यानेही या वेळेत बंद ठेवण्यात येतील.
- भालचंद्र गवळी, अधीक्षक, उद्यान विभाग

Web Title: belapur news garden