पार्किंगला उदासीनतेचे ग्रहण

पार्किंगला उदासीनतेचे ग्रहण

बेलापूर - नवी मुंबईत रेल्वेस्थानकांचे बांधकाम करताना सिडकोने भविष्याचा विचार करून पार्किंगसाठी भूखंड आरक्षित ठेवले होते. जुईनगर रेल्वेस्थानकाजवळही असाच भूखंड आरक्षित आहे; परंतु तेथे वाहनतळ तयार केले नसल्याने गवत उगवले असून, डेब्रिजचे ढीग तयार झाले आहेत. जुईनगर आणि सानपाडा भागातील रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ असते. येथील काही रस्ते अरुंद आहेत. असे असताना या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग होत असल्याने येथील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. नियमाची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसही कारवाई करत नसल्याने ते निर्ढावले आहेत. 

नवी मुंबईतील जुईनगर रेल्वेस्थानकाजवळ वाहनतळासाठी जागा आहे; परंतु तेथे पार्किंग सुरू केले नसल्याने तेथे गवत, कचरा आणि डेब्रिजचे साम्राज्य आहे. येथे एका बाजूला पार्किंग आहे; परंतु ते अपुरे आहे. त्यामुळे नागरिकांना वाहने उभी करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांना अनेकदा वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. सानपाडा पोलिस चौकीजवळ वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सिग्नल आहे; परंतु तो अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीबरोबरच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 

सानपाडा सेक्‍टर १५ आणि १६ येथील रस्त्याच्या कडेला अनेक सोसायट्या व दुकाने आहेत. तेथे पार्किंगसाठी जागा नसल्याने रहिवासी आणि ग्राहकांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी असतात. त्यामुळे तेथे समविषम पार्किंग सुरू केले आहे; परंतु येथे नियमांची पायमल्ली होते. त्यामुळे या ठिकाणच्या वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. सानपाडा सेक्‍टर १० मधील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या बस जुईनगर आणि सानपाडा भागाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभ्या असतात. त्यामुळे एनएमएमटी, बेस्ट आणि अवजड वाहनचालकांना तेथून ये-जा करताना कसरत करावी लागते. सानपाडा सेक्‍टर १० येथे डीमार्टजवळ बेकायदा पार्किंग केले जाते. जुईनगर रेल्वेस्थानकाच्या शेजारील सर्व्हिस रोडच्या कडेला दुधाचे टेम्पो, स्कूल बस, ट्रक, कंटेनर यासारखी अनेक वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होतात. 

कोंडीची ठिकाणे
 सानपाडा मोराज रेसिडेन्सी
 सानपाडा पोलिस चौकी सिग्नल
 जुईनगरमधील डीमार्ट परिसर
 सानपाडा रेल्वेस्थानक
समस्येवर उपाय 
 वाहनांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी नो पार्किंग 
 बंद पडलेला सिग्नल दुरुस्त करावा
 जुईनगरमधील आरक्षित भूखंडावर वाहनतळ
 बेकायदा पार्किंगवर कारवाई
 सुटीत स्कूल बससाठी शाळेच्या मैदानावर पार्किंग

नो पार्किंग क्षेत्र घोषित झालेल्या ठिकाणी कारवाई केली जाते. मनुष्यबळ कमी असल्याने कारवाईत काही अडचणी येतात. सानपाडा पोलिस चौकीजवळील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने तो बंद आहे. तो लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
- श्‍याम शिंदे,  पोलिस निरीक्षक (वाहतूक)

जुईनगर-सानपाडा रेल्वेस्थानकादरम्यान वाहतूक कोंडी होत असेल तर ती सोडवण्यासाठी भूखंडाची चाचपणी करून तोडगा काढण्यात येईल.
- अंकुश चव्हाण,  अतिरिक्त आयुक्त, महापालिका

जुईनगर रेल्वेस्थानकाच्या परिसरात असलेल्या आरक्षित भूखंडावर वाहनतळ सुरू करण्याचा विचार आहे. याबाबत संबंधित विभागाकडे माहिती पाठवली आहे. 
- मोहन निनावे,  जनसंपर्क अधिकारी, सिडको

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com