गणेश आगमनात खड्ड्यांचे विघ्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

बेलापूर - गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस उरले असताना नवी मुंबईतील रस्ते पावसामुळे खड्डेमय बनले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना खड्ड्यांतूनच वाट काढत लाडक्‍या बाप्पाला आणावे लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवावे, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.

बेलापूर - गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस उरले असताना नवी मुंबईतील रस्ते पावसामुळे खड्डेमय बनले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना खड्ड्यांतूनच वाट काढत लाडक्‍या बाप्पाला आणावे लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेने अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवावे, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.

गणरायाच्या स्वागतासाठी घरगुती व सार्वजनिक मंडळांची जय्यत तयारी सुरू झाली आहे; परंतु दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा भागात दोन हजारांपेक्षा जास्त घरगुती व सार्वजनिक गणपतींचे आगमन होते; मात्र महापालिकेच्या उदासीनतेमुळे नेरूळ, सीवूड्‌स, जुईनगर, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचा फटका मूर्ती आणताना गणेश मंडळांना बसणार आहे. गॅस लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्डे बुजवण्याचे तकलादू काम केल्याने पहिल्या पावसातच तेथे पुन्हा खड्डे पडले. ऑगस्टमध्ये पालिकेने काही ठिकाणी डांबरीकरण केले; परंतु पुन्हा पाऊस सुरू झाल्याने तेथेही खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यावर ते बुजवण्याची मागणी मंडळांनी पालिकेकडे केली आहे.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची काही दिवसांपूर्वीच डागडुजी केली होती. सततच्या पावसामुळे काही रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत; परंतु पाऊस थांबल्यानंतर लगेच बुजवण्यात येतील.
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यावेळी पालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवायला हवे होते. चार दिवसांनी गणपतींचे आगमन होणार आहे. दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. तेव्हा आता हे खड्डे कसे बुजणार? मिरवणुकीच्या वेळी या खड्ड्यांचा जास्त त्रास होणार आहे. पाऊस थांबताच पालिकेने खड्डे बुजवावेत. 
- संजय शिंदे, पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळ, नेरूळ

Web Title: belapur news pothole news mumbai