सीवूडस्‌मध्ये वाहतुकीचा बोजवारा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर मॉलमध्ये येत आहेत. या मॉल परिसरातील बेकायदा पार्किंगवर नेहमी कारवाई केली जाते. महापालिकेने येथे "नो पार्किंग'चे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे कारवाई करताना अडथळे येतात. पालिकेने येथे "नो पार्किंग'चे फलक लावावेत यासाठी डीसीपी कार्यालयामार्फत पाठपुरावा सुरू आहे. 
- नंदकुमार कदम, वाहतूक पोलिस निरीक्षक. 

बेलापूर - सीवूडस्‌ रेल्वेस्थानकातील सीवूडस्‌ सेंट्रल मॉलमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असल्याने आणि ते रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेला रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. येथील बेकायदा पार्किंगकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप या परिसरातील रहिवाशांनी केला आहे. 

सीवूडस्‌ रेल्वेस्थानकात आलिशान सेंट्रल मॉल आहे. शहराच्या अनेक भागांतील नागरिक खरेदीसाठी आणि तो पाहण्यासाठी येथे येतात. आता दिवाळी जवळ आल्यामुळे येथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत आहे. मॉलमध्ये पार्किंगची सोय असूनही नागरिक मॉलसमोरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी करत आहेत. या परिसरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वेस्थानकातून ये-जा करणारे प्रवासी व त्यांची वाहने, बस, खासगी वाहने, स्कूल बस, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांची येथे मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथील बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सायंकाळी येथील वाहतुकीचे अक्षरशः तीनतेरा वाजत असल्याने त्याचा त्रास वाहनचालक, प्रवासी आणि परिसरातील रहिवाशांना होत आहे. येथील बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. 

सीवूडस्‌ सेंट्रल मॉलमध्ये दिवसेंदिवस नागरिकांची वर्दळ वाढत आहे. वाहन पार्किंगची सोय असतानाही ते रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे दररोज सायंकाळी येथे वाहतूक कोंडी होते. याकडे वाहतूक विभाग लक्ष देत नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. 
- सचिन गोळे, रहिवासी, नेरूळ. 

Web Title: belapur news traffic diwali shopping