बेस्ट बसने पालिकेकडे मागितली २७०० कोटींची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

best bus

Best Bus : बेस्ट बसने पालिकेकडे मागितली २७०० कोटींची मदत

मुंबई - बेस्ट विद्युत पुरवठा आणि वाहतूक विभागाने नुकताच अर्थसंकल्पीय अंदाज पालिका आयुक्तांसमोर सादर केला. बेस्ट उपक्रमाने वर्ष २०२३-२४ साठी २ हजार कोटी रूपयांच्या तुटीचा अर्थसंकल्पीय अंदाज मांडला आहे. एकुण २७०० कोटी रूपयांची आर्थिक तरतूद पालिका प्रशासनाने बेस्ट उपक्रमासाठी करावी, अशी मागणी बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आली आहे.

बेस्ट उपक्रमाला वाहतूक विभागाकडून २ हजार कोटींचा तोटा झाला आहे. हा तोटा वसुल करण्यासाठीची आर्थिक तरतूद ही पालिकेकडून व्हावी अशी मागणी या अर्थसंकल्पीय अंदाजात करण्यात आली आहे. तर बेस्टच्या ताफ्यात नव्या बस खरेदीसाठी ७०० कोटी रूपयांचे अर्थसहाय्य मिळावे, अशीही मागणी अर्थसंकल्पीय अंदाजातून मांडण्यात आल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितले.

आगामी चार वर्षात बेस्ट फायद्यात

बेस्ट उपक्रमाचा तोटा गेल्या काही वर्षात सातत्याने वाढत गेला आहे. परंतु हा तोटा कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने नियोजन केले आहे. प्रत्येक वर्षनिहाय हा तोटा कमी करण्याचे आमचे उदिष्ट आहे. त्यामुळे सध्या केलेल्या नियोजनानुसार येत्या ४ वर्षांमध्ये बेस्ट उपक्रमाचा तोटा संपवून उपक्रमाला फायद्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे चंद्रा यांनी सांगितले. येत्या आर्थिक वर्षात २०० कोटी रूपयांनी तोटा कमी करण्याचे नियोजन असल्याचे चंद्रा यांनी सांगितले.