प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी 9 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

बेस्ट वर्कर युनियनने 23 ऑगस्ट रोजी संप करायचा की नाही याबाबत मतदान घेतलं होतं. यावेळी 98 टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, यावेळी कामगारांनी बेमुदत संप केला नव्हता.

मुंबई : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी संपाचा निर्णय घेतला असून 9 ऑक्टोबर पासून बेमुदत संपाचा इशारा 'बेस्ट वर्कर युनियन'ने दिला आहे. बेस्ट वर्कर युनियनने गुरुवारी (ता.19) बेस्ट प्रशासनाला संपाची नोटीस दिली.

- रामदास आठवले म्हणतात, 'दलित शब्द पाहिजेच'

बेस्ट वर्कर युनियनने 23 ऑगस्ट रोजी संप करायचा की नाही याबाबत मतदान घेतलं होतं. यावेळी 98 टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, यावेळी कामगारांनी बेमुदत संप केला नव्हता. यानंतर कामगारांनी वडाळा बेमुदत उपोषण केलं होतं. तेव्हा बेस्ट प्रशासनाने या उपोषणाला दाद दिली नव्हती. उपोषणाच्या चौथ्या दिवशी खासदार नारायण राणे यांनी मध्यस्ती केल्यानंतर कामगारांनी उपोषण स्थगित केलं होतं.

यापूर्वी 8 जानेवारी रोजी बेस्ट कृती समितीने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारून 9 दिवस मुंबईकरांना संपाद्वारे वेठीस धरले होते. त्यावेळी संपाचे प्रकरण कोर्टात गेले आणि कोर्टाच्या मध्यस्थीमुळे बेस्ट कृती समितीने संप मागे घेतला होता. त्यावेळी बेस्ट प्रशासनाने आश्वासन देऊनही बेस्ट कृती समितीच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यात आला नाही व सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, असा आरोप बेस्ट वर्कर युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केला आहे.

- डॉ. मनमोहनसिंगांची होती पाकिस्तानवर हल्ल्याची तयारी; कोणी केला गौप्यस्फोट

काय आहेत मागण्या?
बेस्ट कर्मचाऱयांना पालिका कर्मचाऱयांप्रमाणेच बोनस देण्यात यावा. अनुकंपा भरती तातडीने करण्यात यावी. बेस्ट वर्कर्स युनियनसोबत वाटाघाटी करून अंतिम वेतन करार करण्यात यावा. बेस्टचा अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावा, बेस्टकडून वेतन करार होईपर्यंत कर्मचाऱयांना 10 हजार रुपये मासिक अंतरिम वेतन वाढ देण्यात यावी. बेस्टचा बसगाडयांचा ताफा पूर्वीप्रमाणेच 3337 एवढा करण्यात यावा. बेस्ट उपक्रमातील रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

कृती समितीमधील संघटना संपात नाहीत?
बेस्ट वर्कर युनियनने या संपाची हाक दिली असून शशांक राव या संपाचं नेतृत्व करणार आहेत. मात्र, शिवसेना आणि इतर कामगार संघटना या संपात उतरणार नाहीत. बेस्ट प्रशासनाने शिवसेनेशी संलग्न असणाऱ्या कामगार सेनेशी केलेला करार हा शशांक राव यांना रचलेला नाही. बेस्ट वर्कर्स युनियनशी वेगळा करार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी बेस्ट वर्कर्स युनियनला कृती समितीमधील अन्य संघटनांनी साथ दिलेली दिसत नाही. त्यामुळे मागील संपाइतका हा संप यशस्वी होईल का? याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

- भाजप-सेनेच्या यात्रा म्हणजे स्वार्थाची जत्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best Employee can start strike for pending demands from October 9 in Mumbai