वेतनवाढीसाठी पैसे आणायचे कुठून?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मुंबई - वेतनवाढीचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी यासाठी आता पैसे आणायचे कुठून, या विवंचनेत सध्या बेस्ट प्रशासन असल्याचे चित्र आहे. वेतन करार दिल्यास आर्थिक तिजोरीवर पडणारा भार कसा पेलायचा, याचाच विचार सध्या करण्यात येत आहे. 

संप मिटल्याच्या दुसऱ्या दिवशी बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून यासाठी चाचपणी सुरू होती. वेतनवाढीसाठी तातडीने पैसे उपलब्ध करण्यासाठी बिल्डरांकडील थकबाकी वसूल करण्याच्या पर्यायाचा बेस्ट प्रशासनाकडून विचार करण्यात येत आहे.

वेतनवाढीची मागणी मान्य करण्यात आल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर ९ व्या दिवशी मिटला. कामगारांना टप्प्याटप्प्याने वेतनवाढ देण्यात येणार आहे. मात्र ती कशी द्यायची, हे अद्याप निश्‍चित झाले नसून हा तिढा कसा सोडवायचा, हा पेच सध्या प्रशासनापुढे आहे. संप मिटल्यानंतर आज बेस्ट प्रशासनाचे अधिकारी निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेताना दिसत होते. वेतन करार दिल्यास पडणारा आर्थिक भार कसा पेलायचा, या विवंचनेत आता प्रशासन आहे. न्यायालयाने बेस्ट प्रशासन आणि पालिकेला कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नावर तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही बाजू ऐकून घेण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची एक सदस्यीय समिती नेमली असून या समितीला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. या कालावधीत पालिका आणि बेस्ट प्रशासन आपली बाजू मांडतील. वेतनवाढीच्या प्रश्‍नावर टप्प्याटप्प्याने त्यावर तोडगा निघेल, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

सात हजार की तीन हजार चारशे?
कशी वेतनवाढ मिळणार याबाबत आजच सांगता येणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले. शशांक राव यांनी सात हजार रुपये पुढच्या महिन्याच्या वेतनात वाढ मिळेल, असे जाहीर केले आहे, तर आज शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी वेतनवाढ झाली तर तीन हजार चारशे रुपये इतकी होईल, असे स्पष्ट केले. वेतनवाढीबाबत लगेच निर्णय घेता येणार नाही, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

थकबाकी वसुलीचा पर्याय
बेस्टची बस स्थानके, बस आगारे वाणिज्य वापर करण्यासाठी दिली आहेत. त्यापोटी बिल्डरांनी बेस्टचे ३२० कोटी रुपये थकविले आहेत. पालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकांनी त्याची दखल घेतली आहे. मे. कनाकिया स्पेस प्रा. लि., माधवा ग्रुप होल्डिंग्ज प्रा. लि., मे. केएसएन इंडस्ट्रीज लि. यांच्याकडून एक आठवड्यात वसुली करावी, अशी नोटीस पालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकांनी बेस्टला पाठविली आहे. 

Web Title: best employees got relief but now from where to get the money