esakal | रक्तदानाच्या आवाहनाला वाढता प्रतिसाद, 10 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा, मुंबईतही पुरेसा रक्तसाठा
sakal

बोलून बातमी शोधा

रक्तदानाच्या आवाहनाला वाढता प्रतिसाद, 10 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा, मुंबईतही पुरेसा रक्तसाठा

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासू लागला होता. मात्र, राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात किमान 10 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा असून मुंबईतही पुरेसा रक्तसाठा आहे.

रक्तदानाच्या आवाहनाला वाढता प्रतिसाद, 10 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा, मुंबईतही पुरेसा रक्तसाठा

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई, 15 : कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासू लागला होता. मात्र, राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात किमान 10 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा असून मुंबईतही पुरेसा रक्तसाठा आहे. सध्या राज्यातील वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये 29 हजार 224 रक्त युनिट एवढा रक्तसाठा असून तो किमान पुढचे 10 ते 12 दिवस पुरेल असेही सांगण्यात आले आहे. राज्यात एकूण 345 रक्तपेढ्या असून त्यातील जवळपास 30 ते 40 रक्तपेढ्या अजूनही माहिती भरलेली नाही. त्यामुळे रक्तसाठ्याचा आकडा वाढलेलाही असू शकतो असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले आहे.  

महत्त्वाची बातमी :: मला पाडून दाखवा, भर सभागृहात अजित पवारांनी स्वीकारलं मुनगंटीवारांचं चॅलेंज

कोरोनाचे संकट कायम असताना काही दिवसांपासुन राज्यात रक्तसाठा कमी झाल्याच्या तक्रारी आणि बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान केले. त्याचवेळी राज्याला रक्ताची गरज आहे रक्तदानासाठी पुढाकार घ्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला केले. या आवाहनाला जनतेचा वाढता प्रतिसाद असून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भरवण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीरांमध्ये मोठ्या संख्येने रक्तदाते सहभाग घेत आहेत. दरम्यान, मुंबईतही पुरेसा रक्तसाठा असून 3 हजार 840 युनिट रक्त वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये जमा आहे. शिवाय, दररोज रक्त शिबीरे भरवली जात असल्याने त्यात भर होत असल्याचेही डॉ. थोरात यांनी सांगितले आहे.  

महत्त्वाची बातमी ::  "अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते चुकीचंच"

राज्यासह मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी फक्त एका दिवसाचा रक्तसाठा उपलब्ध होता. त्यानंतर, रक्तदानाचे आवाहन करत अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरे भरवण्यात आली आणि त्यातून हा रक्तसाठा जमा झाला आहे.

मुख्यंमत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतरच रक्तदान शिबीरे मोठ्या प्रमाणात भरली जात आहे. त्याचाच सकारात्मक प्रतिसाद सध्या पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी फक्त एका दिवसाचा साठा होता पण, आता हळूहळू त्यात भर झाली असून पुढचे 10 ते 12 दिवस चालेल एवढा रक्तसाठा आहे. त्यात अनेक ठिकाणी शिबीरे घेतली जात आहे. त्यातूनही रक्तसाठा व्हायला मदत होईल असं राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी म्हटलंय. 

मुंबई आणि उपनगरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

माहिती अद्ययावत न करणाऱ्यांवर कारवाई - 

राज्यातील 345 रक्तपेढ्यांना रक्ताच्या साठ्याची माहिती अद्ययावत करण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे. एका आठवड्यात जर रक्तपेढ्यांनी माहिती अद्ययावत केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल शिवाय, रक्तासाठी जास्तीचे पैसे आकारले गेले तरी कारवाईला सामोरे जावे लागेल असे ही डॉ. थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

better response to the call for blood donation adequate blood in mumbai and maharashtra

loading image