गॅंग्ज ऑफ मुंबई : फटका गॅंग तुम्हाला लुटू शकते!

फटका गँगपासून सावध राहा
फटका गँगपासून सावध राहा

मुंबई : शक्ती पिल्ले हे रेल्वे प्रवासी नेहमीप्रमाणे सकाळी ९.४५ च्या लोकलने मालाडहून अंधेरीला निघाले होते. गाडीत गर्दी होती. त्यामुळे ते दरवाजातच उभे होते. लोकलने गोरेगाव स्टेशन सोडले आणि अचानक त्यांच्या हातावर जोरदार फटका बसला. सिग्नलच्या खांबाआड लपलेल्या एकाने लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्या फटक्‍याने पिल्ले खाली कोसळले. त्याबरोबर त्या हल्लेखोराने त्यांच्यावर दगडाने हल्ला केला. त्यांच्या हातातली मोबाईल घेऊन तो पळाला. हे सर्व पाहणाऱ्या एका मुलाने रुळावर जखमी होऊन पडलेल्या पिल्ले यांना बाजूला घेत त्यांचे प्राण वाचवले. 

पिल्ले यांच्यावर हल्ला करणारा गुंड होता फटका गॅंगचा म्होरक्‍या. दीपक भोडकर असे त्याचे नाव. गोरेगाव पश्‍चिमेकडील जवाहरनगर येथे तो राहायचा. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची मोठी टोळी असून, मोबाईल चोरणे आणि त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून बाजारात विकणे हा त्याचा धंदा.
 
मुंबईत अशा अनेक लहान-मोठ्या फटका गॅंग सक्रिय आहेत. अशाच एका गॅंगमधील दोघांना २० जुलैला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यापैकी राहुल चव्हाण (घाटकोपर) हा तर अवघ्या १८ वर्षांचा तरुण होता; तर त्याला फटका गॅंगचे ‘प्रशिक्षण’ देणारा मुश्‍ताक मुल्ला हा २० वर्षांचा होता. अशाच एका फटकामार गुंडाच्या हल्ल्यात ऑगस्ट २०१८ मध्ये कळवा स्थानकात एका तरुणाला प्राणही गमवावे लागले. 

धोकादायक ठिकाणे

  •  जानेवारी ते जून २०१९ : २८१ घटना 
  •  वडाळा हद्दीत सर्वाधिक ५२ घटना 
  •  वडाळा ते जीटीबी नगरदरम्यान २५ 
  •  किंग्ज सर्कल ते वडाळादरम्यान १२ 
  •  कल्याण हद्दीत ५० घटना 
  •  कल्याण ते विठ्ठलवाडीदरम्यान सर्वाधिक १८ घटनांची नोंद
  •  पत्री पूल ते कल्याण, ठाकुर्ली ते कल्याण, कल्याण ते शहाड यासह अन्य भागांतही हैदोस 
  •  ठाणे ते ऐरोली दरम्यानही १४ घटना 
  •  विटावा पूल, मुकंद कंपनीजवळील भाग सर्वाधिक धोक्‍याचा
  •  ठाणे ते दिवादरम्यान पारसिक बोगदा, खाडी पूल, कळवा ते मुंब्रा, ठाणे ते ऐरोली भाग येथे ३४ घटनांची नोंद

फटका गॅंगची कार्यपद्धत 
लोकलच्या दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलणारे किंवा एका खांद्याला बॅग अडकवून प्रवास करणारे लक्ष्य. फटका गॅंगमधले गुंड रुळांच्या बाजूला असलेल्या खांबांच्या किंवा झाडांच्या आड उभे राहतात. दरवाजातील प्रवासी हेरतात आणि त्याच्या हातावर लांब दंडुक्‍याने जोरदार फटका मारतात. त्या अनपेक्षित हल्ल्याने प्रवासी गांगरतो. हातातील मोबाईल वा बॅग खाली पडतो. ही गॅंग त्या वस्तू घेऊन पळून जाते. 

अशी घ्या काळजी...
रेल्वेच्या दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलू नका. बाहेरच्या बाजूला असलेल्या हातात मोबाईल वा बॅग ठेवू नका. बॅग शक्‍यतो आतील बाजूस राहील, याची काळजी घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com