सावधान ! कोविडची दुसरी लाट फेब्रुवारीत ? डॉक्टर सांगतायत कशी घ्यावी काळजी

मिलिंद तांबे
Saturday, 14 November 2020

गरजेनुसार तातडीच्या वेळी कोविडसाठी अधिकच्या खाटा तात्काळ उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबई, ता. 14  : राज्यात कोविडची दुसरी लाट जानेवरी-फेब्रुवारीत येणार असल्याची शक्यता राज्याच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरी युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविड आजाराची दुसरी लाट आलेली दिसून येत आहे. यावरून हा अंदाज वर्तवण्यात आला असून या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून काही महत्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

करोना उद्रेकाच्या उतरणीच्या काळातही प्रयोगशाळा सर्वेक्षण सक्षमपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे राज्य आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दर दिवशी दर 10 लाख लोकसंख्येमागे किमान 140 तपासण्या करण्यात याव्यात, असे आपल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे, त्याचे पालन होणे आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक जिल्हा आणि मनपा क्षेत्रात प्रयोगशाळा चाचणी केंद्रे कार्यान्वित करुन त्यांची माहिती विविध माध्यमांतून जनतेला देण्यात यावी असे निर्देश ही त्यांनी दिले आहेत.

महत्त्वाची बातमी  : "माझं खासगी आयुष्य तिथेच संपलं", मुलाखत देताना संजय राऊत झालेत भावनिक

दुसऱ्या लाटेसंदर्भातील सतर्कतेचा इशारा वेळेवर मिळावा, यासाठी शहरांसह ग्रामिण भागात फ्यू क्लिनिक सुरू करून फ्लू सदृश्य रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांच्याकडून इन्फ्ल्यूंझा सदृश्य रुग्णांच्या आठवडी अहवालाचे अवलोकल करण्यात येणार आहे. तसेच फ्ल्यू सारखे आजार असणारे रुग्ण आढळणाऱ्या भागात प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येणार असून गृहभेटीद्वारे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक वेगाने करण्य़ाचे निर्देश ही देण्यात आल्याचे डॉ अर्चना पाटील यांनी सांगितले.

सामाजिक संपर्क अधिक असणा-या व्यक्तींच्या माध्यमातून कोविड आजाराचा प्रसार अधिक वेगाने होतो, अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात छोटे व्यावसायिक , घरगुती सेवा पुरविणारे कामगार, वाहतूक व्यवसायातील लोक,  मालवाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पो चालक, रिक्षाचालक, सेक्युरिटी गार्ड सुरक्षारक्ष, शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच पोलिस, होमगार्ड इत्यादींचा समावेश आहे.

कोविडचे रुग्ण कमी होत असल्याने कोविड आणि नॉन -कोविड रुग्ण संख्येच्या प्रमाणानुसार रुग्णालये निर्धारित केले जातील. तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्सना नॉन कोविड रूग्णालय करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र गरजेनुसार तातडीच्या वेळी कोविडसाठी अधिकच्या खाटा तात्काळ उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच टास्क फोर्सला परिस्थितीचा आढावा घेऊन आपले निरिक्षण नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. कोविडसाठी लागणारी औषधे आणि साधनसामुग्रीचा बफर स्टॉक उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर आजारी व्यक्तींसाठी को-मॉर्बिडिटी क्लिनिक सुरु करण्यात येणार असल्याचे ही डॉ पाटील यांनी सांगितले. 

महत्त्वाची बातमी ७३ वर्षांनंतर मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या शिवाजी पार्कच्या नावात बदल

देशात मागील 24 तासांत 47 हजार 905 कोरोनाचे नवे रूग्ण सापडले आहेत. तर 550 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीत ही पहिल्यांदाच 8 हजाराहून अधिक रूग्ण सापडले आहेत. या आकडेवारीवरून दिल्लीत दुसरी लाट आल्याचे सांगितले जातेय. दिवाळी आणि त्यानंतरचे पुढील थंडीचे दिवस कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत.   

अशी घ्या काळजी

  • गर्दीच्या ठिकाणी किंवा समूहात असताना मास्कचा वापर अनिवार्य
  • हातांची स्वच्छता, नेहमी स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची नियमित स्वच्छता
  • दोन व्यक्तींमध्ये शारिरिक अंतर राखणे, मुखपट्टीचा वापर
  • सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान आणि थुंकणे टाळणे,
  • अनावश्यक प्रवास टाळणे, 
  • कोविड रुग्ण, त्यांचे कुटुंबिय यांच्याशी सामाजिक भेदभाव टाळणे
  • समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर, अफवा, चुकीचे मेसेज फॉरवर्ड करु नयेत
  • मानसिक ताणतणाव टाळण्याकरिता मित्र, नातेवाईकांशी बोलावे. आवश्यक तेव्हा तज्ञांचा सल्ला घ्यावा.

beware second wave of covod 19 may hit in January or march

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beware second wave of covod 19 may hit in January or march