Bhagat Singh Koshyari : सैन्य दलाच्या जवानांप्रमाणे पोलीसांबद्दल जनमानसात आदराची भावना; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari statement respect among the public for police as like army mumbai

Bhagat Singh Koshyari : सैन्य दलाच्या जवानांप्रमाणे पोलीसांबद्दल जनमानसात आदराची भावना; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सोमवारी 2 जानेवारीला साजरा करण्यात आला.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पाडला.

या कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रजनीश सेठ , मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच मुंबई पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, पोलीस जवान व निमंत्रित उपस्थित होते.

2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे 2 जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केल्या जातो.

सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. संचलनामध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, निशाण टोळी, महिला पोलीस व बँड पथक सहभागी झाले होते.

यावर्षी बँड पथकाकडून स्वतंत्र वादन, कमांडोज तर्फे मौखिक आदेशाविना सशस्त्र कवायत तसेच श्वानपथकातर्फे गुन्हे अन्वेषण व प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यक्रमाला संबोधन आपले मनोगत व्यक्त केले. राज्याचे पोलीस दल संपूर्ण देशात सर्वश्रेष्ठ मानले जाते.

सैन्य दलांच्या जवानांप्रती लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच भावना राज्याच्या पोलीसांप्रती देखील आहे. करोना प्रकोपाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस यांच्या प्रमाणेच राज्यातील पोलीसांनी देखील जीवाची पर्वा न करता कार्य केले त्यामुळे राज्य पोलीस अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये पोलीस दलातील आव्हाने वाढली आहेत. सागरी सुरक्षा, नक्षलवाद यांसारखे धोके आहेतच. त्याशिवाय सायबर सुरक्षा, युवकांमध्ये वाढती नशाखोरी आदी नव्या आव्हानांमुळे पोलिसांना दुप्पट सतर्क राहणे गरजेचे आहे.

राज्य शासन पोलीस दलाचे आधुनिकीकरण करीत आहे तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती देखील होत आहे. पोलीसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य तसेच देश अधिक सुरक्षित करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. आपल्या कृतीतून राज्य पोलिसांनी गीतेतील 'परित्राणाय साधुनां, विनाशाय च दुष्कृताम' हे ब्रीद सार्थक केले असल्याचे त्यांनी सांगितले.