मोठी बातमी! मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन भाई जगतापांना हटवलं; वर्षा गायकवाडांची वर्णी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मोठी बातमी! मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन भाई जगतापांना हटवलं; वर्षा गायकवाडांची वर्णी

मुंबई : राज्याच्या राजकारणात आणखी एक महत्वाची घडामोड सध्या पहायला मिळत आहे. त्यानुसार, काँग्रेसनं मुंबई अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांना हटवलं असून ही जबाबदारी आमदार वर्षा गायकवाड यांच्याकडं सोपवण्यात आली आहे. (Bhai Jagtap was removed from post of Mumbai Congress President Varsha Gaikwad new president)

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं हा निर्णय घेतला असून यांसह इतर नियुक्त्यांबाबतच अधिकृत पत्र काँग्रेसनं काढलं आहे. या पत्रात म्हटलं की, काँग्रेस अध्यक्षांनी पुढील प्रादेशिक काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षपदांची नियुक्ती केली आहे.

यामध्ये गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी खासदार शक्तीसिंह गोहील यांची नियुक्ती तर पुद्दुचेरी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी खासदार वैथिलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर आमदार वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

तत्काळ प्रभावानं नियुक्ती

विशेष म्हणजे या तिन्ही नियुक्त्या तात्काळ प्रभावानं करण्यात आल्या आहेत. म्हणजेच सध्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी आता वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसचा कारभार पाहणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

काय असू शकतं कारण?

लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईत काँग्रेसला बळ मिळावं तसेच जागा वाटपांबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी काँग्रेसनं वर्षा गायकवाड यांना इथं आणण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

वर्षा गायकवाड प्राध्यापक असून धारावी विधानसभा मतदारसंघातून त्या अनेक टर्म निवडून आल्या आहेत. एकूणच मुंबईतल्या अनेक भागात त्यांचा चांगला संपर्क असल्यानं त्यांच्या नावाची वर्णी लागल्याचं सांगितलं जात आहे.