esakal | 'त्या' कोसळलेल्या इमारतीच्या जागी दीड वर्षांत उभारणार टॉवर, दुर्घटनेनंतर महिन्याभरात मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

'त्या' कोसळलेल्या इमारतीच्या जागी दीड वर्षांत उभारणार टॉवर, दुर्घटनेनंतर महिन्याभरात मंजुरी

भानुशाली इमारतीच्या जागी १८ महिन्यांत सुसज्ज टॉवर उभारू, अशी हमी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. खासदार अरविंद सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे महिनाभरातच हा पुनर्विकासाचा प्रश्न सुटला असून हे असे पहिलेच उदाहरण आहे. 

'त्या' कोसळलेल्या इमारतीच्या जागी दीड वर्षांत उभारणार टॉवर, दुर्घटनेनंतर महिन्याभरात मंजुरी

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबईः गेल्या महिन्यात मुंबईतील फोर्ट भागातील भानुशाली इमारत कोसळली.  या दुर्घटनेत दुर्दैवाने एकूण १० जणांना आपले प्राण गमवावे लागले. भानुशाली इमारतीच्या जागी १८ महिन्यांत सुसज्ज टॉवर उभारू, अशी हमी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. खासदार अरविंद सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे महिनाभरातच हा पुनर्विकासाचा प्रश्न सुटला असून हे असे पहिलेच उदाहरण आहे. 

या इमारतीमधील रहिवाशांना संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ हजर होते. दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सतत पाठपुरावा केल्याने तसेच म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या प्रयत्नांनी या रहिवाशांचा प्रश्न महिनाभरातच सुटला आहे. पुनर्विकासाच्या या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अशा प्रकारे पडलेल्या इमारतीमधील रहिवाशांचा प्रश्न जवळपास महिन्याभरात सोडवला गेल्याचे हे पहिलेच उदाहरण असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचाः संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्याची भाजपनं उडवली खिल्ली

सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे आपण कोणाच्या तरी आयुष्यात आनंद देऊ शकलो, असे सांगून आव्हाड यांनी सावंत यांचे आभार मानले. भानुशाली इमारतीच्या जागेवरच १८ महिन्यांमध्ये नवीन तंत्रासह सुसज्ज टॉवर उभा राहील आणि तो या प्रकारचा मुंबई मधील पहिला पायलट प्रोजेक्ट असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. १६ जुलैला ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले होते. त्यापूर्वीच तिच्या पुनर्विकासाची तयारी सुरु होती, मात्र लॉकडाऊनमुळे त्यास उशीर झाला.

अधिक वाचाः जितेंद्र आव्हाड धावले संजय राऊतांसाठी, टीकाकारांना दिलं 'असं' उत्तर

भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्या वतीने करण्याची ग्वाहीही अस्लम शेख यांनी दिली आहे.

(संपादनः पूजा विचारे)

Bhanushali building replaced by a well equipped tower in a year and a half