भिवंडी महापालिकेतील कॉंग्रेसचे सभागृहनेते तडीपार

file photo
file photo

मुंबई : भिवंडी महापालिकेचे सभागृह नेता व कॉंग्रेसचे नगरसेवक खान मतलुब अफजल ऊर्फ मतलुब सरदार यांना भिवंडीचे पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी हद्दपारीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या गटात खळबळ उडाली आहे; तर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या इतरही आठ नगरसेवकांवर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे हे थांबवण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू झाली असून त्याकरिता सध्या राजकीय दबावदेखील टाकला जात आहे.

ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई होत असल्याने कॉंग्रेस पक्षाच्या गोटात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक माजी उपमहापौर अहमद सिद्दीकी हेसुद्धा गेल्या सहा महिन्यांपासून फरारी असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. मात्र ते अद्याप सापडत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेख खालिद गुडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सरदार यांच्यावर एमआरटीपी, मारहाण, धमकावणे व दहशत पसरविणे अशा स्वरूपाचे गुन्हे शांतीनगर पोलिस ठाण्यात दाखल असून 25 फेब्रुवारी 2019 रोजी एका बांधकाम व्यावसायिकाकडून चार लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी खान मतलुब सरदार यास अटकसुद्धा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस उपायुक्त परिमंडळ- 2 चे पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांच्या आदेशावरून शांतीनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डिसोझा यांनी खान मतलुब सरदार यांना मंगळवारी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगरसह नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्राबाहेर दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याची माहिती दिली. विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे भिवंडी शहर कॉंग्रेस गोटात खळबळ उडाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com