esakal | टंचाईग्रस्त कांबे गावाला गणेशोत्सवात रोज टँकर; हायकोर्टात सरकारची हमी
sakal

बोलून बातमी शोधा

Water Tanker

टंचाईग्रस्त कांबे गावाला गणेशोत्सवात रोज टँकर; हायकोर्टात सरकारची हमी

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई : भिवंडी परीसरातील टंचाईग्रस्त (bhivandi water problem) कांबे गावाला (kambe village) गणेशोत्सवात (Ganpati Festival) रोज दहा टँकर भरून पाणी (tanker water) पुरविण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने (mva government) आज उच्च न्यायालयात (Mumbai high court) दिली. त्यामुळे या ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: परिवहन मंत्र्यांच्या गुगलीने म्हाडा अधिकारी गोंधळात

या गावाला महिन्यातून फक्त दोनदा पाणीपुरवठा होत असल्याचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयासमोर आहे. तात्पुरता उपाय म्हणून 10 सप्टेंबरपासून दहा दिवस या गावाला रोज दहा टँकर पाणी दिले जात आहे, असे सरकारने आज न्या. एस. जे. काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे सांगितले. या गावाला पाणीपुरवठा करण्याचा आदेश न्यायालयाने यापूर्वी दिला होता. गावात तीनशे अवैध पाणीजोडण्या असल्याने गावाला नियमित पाणी दिले जात नाही. गावाला मंजूर झालेल्या कोट्यानुसार आम्हाला पाणी द्यावे, असे ग्रामस्थांनी न्यायालयात सांगितले आहे. मुख्य जलवाहिनीवरील तीनशे अवैध जोडण्या काढून टाकव्यात. यातून फक्त राजकारण्यांना, बांधकाम व्यावसायिकांना, गोदामांना तसेच टँकर लॉबीला अवैध पाणीपुरवठा केला जातो, असेही त्यांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांना नियमित पाणी न देणे ही मूलभूत हक्कांची पायमल्ली आहे, असे मत खंडपीठाने यापूर्वीच व्यक्त केले होते. या अवैध जोडण्या काढून ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा सरकार करेल, त्याचा कृती आराखडाही सादर केला जाईल, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या आधीच्या भूमिकेबद्दल माफी मागितली. याचिकेतील मुद्यांवर त्वरेने तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या समस्येवरील कायमस्वरुपी उपाय म्हणून नवी जलवाहिनी टाकण्यासाठी भूसंपादन त्वरेने केले जाईल. मात्र यासाठी निश्चित कालमर्यादा आताच देता येणार नसल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले. याचिकेवर पुढील सुनावणी महिनाअखेरीस होईल.

loading image
go to top