भुजबळांना बॉम्बे रुग्णालयात ठेवणे अयोग्य

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

ईडीचा न्यायालयात दावा; राजकीय नेत्यांनी भेट घेतल्याकडे वेधले लक्ष
मुंबई - "महाराष्ट्र सदन' गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये राहणे बेकायदा होते. त्यांना रुग्णालयात आमदार-खासदार अशा 25 व्यक्ती भेटायला आल्या होत्या, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात दिली. भुजबळ यांना पुन्हा जे. जे. रुग्णालयात पाठवल्याचेही ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी सांगितले. 22 ते 29 नोव्हेंबरदरम्यानचे बॉम्बे हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही चित्रीकरणही त्यांनी न्यायालयास सादर केले.

भुजबळ यांचे खासगी रुग्णालयात राहणे बेकायदा असल्याचा दावा ईडीसोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही केला होता. भुजबळ यांना उपचारादरम्यान काही चाचण्या करायच्या असल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती.

या चाचण्या पूर्ण होताच त्यांना पुन्हा जे. जे. रुग्णालयात पाठवणे अपेक्षित होते. तुरुंग अधीक्षक किंवा जे. जे. रुग्णालयाच्या अधीक्षकांनी भुजबळ पुन्हा मूळ रुग्णालयात आले आहेत का, हे तपासले नसल्याने ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तब्बल 41 दिवस राहिले, असा दावा त्यांनी केला. तुरुंगाबाहेर अशा पद्धतीने आरोपीने राहणे चुकीचे असून, आतापर्यंत तीन वेळा वैद्यकीय कारणास्तव भुजबळ तुरुंगाबाहेर राहिल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देण्यात आली. दरम्यान, या मुद्द्यावर भुजबळ यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकावे, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केल्याने हे प्रकरण शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

दमानियांचे आरोप फेटाळले
"स्ट्रेस थॅलियम' चाचणी करण्यासाठी भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. चाचणी पूर्ण होताच त्यांना पुन्हा जे. जे. रुग्णालय किंवा तुरुंगात पाठवणे अपेक्षित होते. जे.जे.चे अधीक्षक टी. पी. लहाने यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच बेकायदा पद्धतीने भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये राहिले. विराट कोहली या क्रिकेटपटूप्रमाणे त्यांची तब्येत एकदम ठणठणीत असल्याचा त्यांचा वैद्यकीय अहवाल सांगतो. त्यामुळे अशा बेजबाबदार अधीक्षकाला पदावरून हटवावे, अशी मागणीही दमानिया यांनी केली. या प्रकरणाची चौकशी गृह व आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांचे आरोप न्यायालयात हजर असलेल्या डॉ. लहाने यांनी फेटाळले. भुजबळ यांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील वास्तव्यात कुठल्याही पद्धतीचा बेजबाबदारपणा आपल्याकडून झालेला नाही, असा दावा त्यांनी केला.

Web Title: Bhujbal inappropriate to Bombay Hospital